कोंढवा: समान पाणीपुरवठा करण्याच्या घोषणा थांबवा अन् समाविष्ट गावांतील लोकांच्या वेदना समजून घ्या! या गावांमधील नागरिकांसह पशू-पक्षीसुद्धा तहानेने व्याकूळ झाले आहेत. महापालिका प्रशासन बेभरवसे काम करीत असून, नागरिक प्रामाणिकपणे कर भरत आहेत. या गावांचा विकास करणे दूरच, साधे नागरिकांना पिण्यासाठी पाणीही मिळत नाही. या गावांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना दिवसभर वणवण करावी लागत असल्याचे वास्तव आहे.
कोंढवा, उंड्री, पिसोळी, वडाचीवाडी, औताडवाडी, होळकरवाडी आणि वाड्या-वस्त्यांवर सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत असून, लोकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. लोकांनी कामधंदे करायचे की पाण्यासाठी भटकंती करायची, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महापालिकेचे पाणी सोसायट्यांना मिळत नसल्यामुळे त्यांना खासगी पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहे. पाण्यासाठी सध्या सोसायट्यांना महिन्याला लाखो रुपयांचा खर्च करावा लागत आहे. यामुळे रहिवाशांना सोसायट्यांचा मेंटेनन्स भरणेही मुश्कील झाले आहे. सर्वसामान्य लोकांचे महागाईने कंबरडे मोडले असताना त्यांच्यावर आता पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
वडाचीवाडी येथे महापालिका प्रशासनाने जागोजागी पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत. पण, त्यात वेळेवर पाणी सोडले जात नाही. त्यामुळे नागरिकांना दिवस-रात्र टँकरची वाट पाहावी लागत आहे. कोंढवा गावात देखील सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. लोक पाण्यासाठी दिवसरात्र नळाकडे डोळे लावून बसत आहेत. समान पाणीपुरवठ्याच्या गप्पा बाजूला राहू द्या; अगोदर समाविष्ट गावांतील लोकांची तहान भागविण्यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
समाविष्ट गावांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्याच्या प्रश्नाबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही उपयोग होताना दिसून येत नाही. या गावांमध्ये प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा न करता जलवाहिन्यांतून पाणी देण्यासाठी उपायोजना होणे आवश्यक आहे. या भागातील पाणी प्रश्न वेळीच सोडविला नाही, तर नागरिकांच्या वतीने महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल.निवृत्ती बांदल, नगरसेवक
उंड्री गाव महापालिकेत समाविष्ट होऊन दहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, या भागातील पाण्याची समस्या अद्यापही सुटली नाही. यासाठी प्रशासनाकडून ठोस नियोजन अद्यापही झाले नाही. आम्हाला टँकरचे पाणी नको, तर जलवाहिनीतून पाणीपुरवठा करा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. प्रशासन जर टँकरचेच तुणतुणे वाजविणार असेल, तर नागरिकांच्या वतीने जनआंदोलन केले जाईल.श्वेता घुले, नगरसेविका
जलवाहिन्यांच्या देखभाल, दुरुस्ती कामामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. समाविष्ट गावांतील पाणीपुरवठा लवकरच सुरळीत केला जाईल.दीपक रोमण, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग