Kondhwa Election Pudhari
पुणे

Kondhwa Election: चार जागांवर बारा माजी नगरसेवकांची टक्कर! कोंढवा–कौसरबाग प्रभागातील निवडणुकीला रंग चढला

विकासाचा मुद्दा की जातीय समीकरणे? मुस्लिम बहुल प्रभागात उमेदवारांची चुरस, राजकीय भविष्य टांगणीला

पुढारी वृत्तसेवा

कोंढवा-कौसरबाग या मुस्लिम बहुलभाग असलेल्या प्रभागात तब्बल 12 माजी नगरसेवक इच्छुक आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यात इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच उमेदवारीच्या स्पर्धेचा इच्छुकांना सामना करावा लागणार आहे. तर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ देणाऱ्या या भागात आता जातीय समीकरणे महत्त्वाची ठरणार की, मतदार विकासकामांना कौल देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रभाग क्रमांक : 19 कोंढवा खुर्द-कौसरबाग

कोंढवा खुर्द - कौसरबाग या प्रभागात ‌‘अ‌’ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ‌‘ब‌’ गट सर्वसाधारण (महिला) आणि ‌‘क‌’ व ‌‘ड‌’ गट सर्वसाधारण प्रवर्ग, असे आरक्षण आहे. या प्रभागात मुस्लिम मतदार 70 टक्के, तर हिंदू, अनुसूचित जाती प्रवर्ग (एससी), अनुसूचित जमाती प्रवर्ग (एसटी) आणि ख्रिश्चन समाजाचे मिळून 30 टक्के मतदार आहेत. यामध्ये हिंदुचे मते निर्णायक ठरू शकतात. प्रभागाची लोकसंख्या सुमारे 84 हजार आहे. पूर्वी हा भाग शिवसेनेचा बाल्ले किल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र मुस्लिम मतांचा टक्का वाढला आणि शिवसेनेत फूट पडल्यामुळे येथील राजकीय समीकरणे गेल्या काही वर्षांत बदलत गेली.

महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीन, तर मनसेने एक जागा जिंकली होती. त्या वेळी या प्रभागात ओबीसी पुरुष प्रवर्ग, खुला पुरुष प्रवर्ग आणि दोन जागा महिलासाठी आरक्षित होत्या. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची आकडेवारी पाहिली, तर मुस्लिम समाजाने महायुतीला नाकारल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढविल्यास राष्ट्रवादीला येथील मुस्लिम मतदार साथ देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र, याबाबत सांशकता असल्याने, तसेच उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा असल्याने काही इच्छुक पक्षांतर करण्याची शक्यता आहे. शिवसेनेमधून (ठाकरे गट) माजी आमदार महादेव बाबर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला असून, त्यांची भुमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत कोंढव्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चांगली मते मिळाली होती. यामुळे महायुतीतील काही इच्छुक महाआघातील घटक पक्षांत प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे. नवीन प्रभाग रचनेत काही नेत्यांची हक्काची मते असलेला भाग या प्रभागातून वगळण्यात आल्यामुळे माजी नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. एमआयएम, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, एचडीपीआय, एसपीडीआय, मुस्लिम काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, आरपीआय या पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तसेच अपक्ष उमेदवारही आपले भविष्य अजमणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसककडून (अजित पवार गट) माजी नगरसेवक ॲड. गफूर पठाण, रईस सुंडके, माजी नगरसेविका परवीन शेख, हामिदा सुंडके, नंदा लोणकर, हसिना इनामदार, संजय लोणकर, प्रसाद बाबर यांची नावे चर्चेत आहेत. तसेच समीर पंजाबी, नाजिया समीर पंजाबी, राजू अडागळे हे देखील इच्छुक आहेत. जुना प्रभाग 26 चे तीन तुकडे करून त्यातील 30 टक्के भाग कोंढव्याला जोडला आहे. या भागात माजी नगरसेविका नंदा लोणकर यांचे प्राबल्य आहे.

मनसेेने गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला चांगली लढत दिली होती. विकासकामे आणि मुस्लिम बहुल प्रभागात नागरिकांशी ठेवलेली जवळीक ही मनसेची जमेची बाजू आहे. मनसेकडून साईनाथ बाबर आणि त्यांची पत्नी आरती बाबर यांची नावे चर्चेत आहेत. तसेच अमोल सिरस देखील इच्छुक आहेत. सतिश शिंदे व त्यांची पत्नी सुप्रिया शिंदे या मनसेमधून शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला असून, त्यांच्याकडून देखील निवडणुकीची तयारी सुरू आहे. भाजपकडून समीर पठाण, अमर गव्हाणे, सत्पाल पारगे, अक्षय शिंदे, अनुराधा शिंदे, प्रविण जगताप हे इच्छुक आहेत.

शिवसेनेकडून (ठाकरे गट) माजी नगरसेवक तानाजी लोणकर, भरत चौधरी, सचिन ननावरे, माजी नगरसेविका मेघा बाबर, राजेंद्र बाबर, सचिन कापरे, अमर पवळे, सोमनाथ हारपुडे, सुनील मोरे, दादासाहेब भनगे, सतीश गोते, शंकर लोणकर, शहबाज पंजाबी, अजिज शेख, बाळासाहेब हरपळे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मजर मणियार, मोहसीन हसन शेख, कासिफ सय्यद, असिफ शेख, आयुब शेख, छबिल पटेल यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसकडून देवदास लोणकर, ज्योत्स्ना लोणकर, मोबीना अहमद खान, अबोली शोएब ईनामदार, नूर शेख, अकबर शेख, अल्ताफ शेख, सुलतान खान, शोएब खान, माया डुरे, आसमा खान इच्छुक आहेत.

नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार का?

गेल्या विधानसभा निवडणुकीत महादेव बाबर आणि प्रशांत जगताप यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच झाली होती. अखेर जगताप यांना तिकीट मिळाले होते. मात्र बाबर यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेवार गंगाधर बधे यांना निवडणूक रिंगणात उतरविले होते. त्या वेळी पराभूत झाल्याचे शल्य जगताप यांच्या मनात सहाजिकच असणार आहे. यामुळे या प्रभागात नवीन ट्विस्ट नक्कीच पाहायला मिळणार असल्याची चर्चा नागरिकांत आहे.

तीन पक्षांच्या शहराध्यक्षांचा लागणार कस

आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, शिवसेनेचे (शिंदे गट) शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांची या प्रभागावर बारीक नजर असणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या तिन्ही शहराध्यक्षांचा या प्रभागात कस लागणार आहे. हडपसर विधानसभा मतदार संघातील सर्वधर्मिय नागरिकांचा हा महत्त्वाचा प्रभाग आहे. त्यामुळे या प्रभागात आपले वर्चस्व वाढविण्यासाठी तिन्ही पक्षांचे शहराध्यक्ष प्रयत्न करणार यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT