

पुणे : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तीन वर्षांच्या खर्चाचे तसेच दिलेल्या साहित्याची चौकशी करण्यात येईल, अशा सूचना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन (एमओए) चे अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्या.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये असोसिएशनच्या नव्या पदाधिकारी आणि कार्यकारिणीच्या नावाच्या यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष केंद्रिय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, असोसिएशनचे नवनिर्वाचित सरचिटणीस संजय शेटे, मावळते सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांसह सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते.
या सभेची सुरुवात ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आली. यावेळी मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखविण्यात आला. या सभेमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी गुजरात आणि गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खर्चाबाबतची माहिती विचारली तसेच खेळाडूंना दिलेल्या क्रीडा साहित्य दुय्यम दर्जाचे असल्याबाबतचा प्रश्न उपस्थितीत केला.
या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, गुजरात आणि गोवा येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट दर्जाचे साहित्य दिलेले होते. तरीही याबाबत संपूर्ण चौकशी केली जाईल. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर वरिष्ठ उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
‘एमओए’च्या सर्वसाधारण सभेमध्ये गुजरात, गोवा आणि उत्तरांचल येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये शासनाकडून दिलेल्या 12 कोटी 48 लाख रुपयांच्या खर्चाबाबतचा प्रश्न उपस्थितीत करण्यात आला. मात्र, अध्यक्षांनी केवळ चौकशी करून निर्णय घेऊ एवढे माफक उत्तर देत या विषयाला बगल दिल्याची चर्चा उपस्थितीत पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली होती.