पौड रोड : दुसऱ्या मजल्यावर पोलिस चौकी, त्याला लोखंडी जिन्याच्या पायऱ्या, अशा ठिकाणी आमची तक्रार घेऊन जायचं असेल, तर कसं जावं? शिवाय एखाद्या अत्याचारग्रस्त, अपघातग्रस्त व्यक्तीला तक्रार द्यायची असेल, तर तो कसा पोहचू शकेल, असा सवाल किष्किंधानगर पोलिस चौकीबाबत नागरिकांकडून पोलिस प्रशासनाला करण्यात येत आहे. या पोलिस चौकीसाठी सोयीस्कर जागा मिळाली पाहिजे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. (Latest Pune News)
शहराचे मध्यवर्ती ठिकाण बनत असलेल्या कोथरूडमधील किष्किंधानगर परिसर आहे. या परिसरात रात्रीच्या सुमारास गाड्यांची तोडफोड, महिला, विद्यार्थिनींवरील छेडछाडीचे प्रकार, हाणामारीच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत.
या परिसराची गरज लक्षात घेऊन डिसेंबर 2009 मध्ये पोलिस चौकीला मान्यता मिळाली. मात्र, जागेअभावी येथे महापालिकेचे समाजमंदिर असलेल्या विठ्ठल मंदिरावरील असलेल्या दुसऱ्या मजल्यावर 2013 मध्ये ही चौकी सुरू करण्यात आली. या पोलिस चौकीत प्रवेश करण्यासाठी असलेल्या लोखंडी जिन्याच्या 20 ते 22 पायऱ्या चढून जाव्या लागतात. साहजिकच, तक्रार देण्यासाठी वा अन्य कामासाठी इथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला यांना पायऱ्या चढण्याची मोठी कसरत करावी लागत आहे.
महिला अधिकाऱ्याची आवश्यकता
किष्किंधानगरमध्ये अनेक कामगार तसेच स्थलांतरित नागरिकांची वस्ती अधिक आहे. पती-पत्नीमध्ये होणारी भांडणे, मुलींच्या छेडछाडीच्या तक्रारींचे प्रमाणही मोठे असते. अशा महिलांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी महिला अधिकाऱ्याची उपस्थिती असणे गरजेचे असते.
मात्र, येथे एकही महिला पोलिस अधिकारी नाही. पोलिस ठाण्यात महिला अधिकारी असल्यास महिला तक्रार नोंदविण्यासाठी पोलिसांकडे जाण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. ती तिच्या समस्यांबद्दल उघडपणे बोलू शकते. पुरुष अधिकाऱ्यांसमोर एक स्त्री तिच्या सर्व समस्या उघड करू शकत नाही, त्यामुळे येथे एकतरी महिला अधिकारी नेमण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
महिलांची तक्रार कोणत्या स्वरूपाची आहे, त्यानुसार महिला पोलिस अधिकारी दिले जातील. महिलांच्या समस्या ऐकण्यासाठी महिला बिट मार्शल देखील चौकीला असतात.संदीप देशमाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोथरूड पोलिस ठाणे