

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत बस डेपो आणि बसस्थानकांसाठी आरक्षित असलेल्या जागा तातडीने आम्हाला द्या, अशा मागणीचे पत्र पीएमपी प्रशासनाने दोन्ही महापालिकांसह पीएमआरडीएला दिले आहे. तसेच, प्रवाशांची वाहतूक सुलभ होण्याच्या दृष्टीने आणखी आरक्षित नसलेल्या मात्र, पीएमपी डेपो, बसस्थानक प्रवाशांसाठी उपलब्ध करता येतील, अशा जागाही मिळाव्यात, अशी मागणी पीएमपीकडून करण्यात आली आहे. (Latest Pune News)
पीएमपीच्या ताफ्यात लवकरच नव्या 1200 बस दाखल होणार आहेत. त्यासाठी पीएमपी प्रशासनाला 8 ते 10 नवे डेपो, बस स्थानकांची आवश्यकता भासणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पीएमसी, पीसीएमसी आणि पीएमआरडीएच्या हद्दीतीलआरक्षित जागांची पीएमपी प्रशासनाकडून चाचपणी युद्धपातळीवर सुरू आहे. त्याकरिता पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. आणि जागा मागणीसाठी पत्रव्यवहार सुरू आहेत. सध्या पीएमपीच्या सध्या 2,001 बस आहेत, त्यापैकी 1 हजार 812 बस प्रत्यक्ष मार्गावर असतात. त्यातही बेकडाऊनमुळे यातीलही 50 ते 70 बस दररोज बंद असतात. त्यामुळे पुणेकरांना बसगाड्यांची संख्या अपुरी पडत आहे.
अशा येणार नव्या बस...
दोन्ही महापालिका - 700 बस
पीएमआरडीए - 500 बस
एकूण - 1200 नव्या बस येणार
पीएमपीकडील सध्याचे डेपो - 17
आवश्यक डेपो - 8 ते 10
पीएमपीच्या ताफ्यातील बस - 2001
प्रत्यक्ष मार्गावरील बस- 1812
लोकसंख्येनुसार आवश्यक बस - 3,500पेक्षा अधिक बस
नव्या गाड्या पार्क कुठे करणार?
मागील काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत नव्या बस खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए यांच्याकडून एकूण 1200 बस खरेदी करून देण्याचे ठरले. आता लवकरच पीएमपीच्या ताफ्यात या नव्या बस दाखल होणार आहेत. मात्र, त्या पार्क करणार कुठे? असा मोठा प्रश्न समोर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पीएमपी अधिकारी डेपो, बसस्थानकांसाठी आरक्षित जागा मिळविण्याचे प्रयत्न करत आहेत.
पीएमपीच्या ताफ्यात नव्या 1200 गाड्या येणार आहेत, त्यांच्यासाठी 8 ते 10 नव्या डेपोंची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने आम्ही पीएमसी, पीसीएमसी आणि पीएमआरडीए भागातील जागांची पाहणी करत आहोत. रांजणगाव आणि चाकण एमआयडीसीमध्ये दोन जागा आम्हाला मिळत आहेत, त्यासंदर्भातील पत्र देण्यात आले आहे. याशिवाय पीसीएमसी हद्दीतील भोसरी, निगडी भागात तर देहू, चिखली, एनडीए या पीएमआरडीएच्या भागात जागेसाठी पाहणी सुरू आहे. याशिवाय वारजे-माळवाडी पीएमसीच्या हद्दीतही डेपोच्या जागेसाठी पाहणी केली जात आहे. आरक्षित जागा मिळवून प्रवाशांना सुसज्ज डेपो, बसस्थानके मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासंदर्भात आरक्षित जागा मागणीसाठी पत्र दोन्ही महापालिकांना देण्यात आले आहेत.
सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल