

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेची बहुचर्चित निवडणूक अखेर लवकरच होण्याची शक्यता असून, शनिवारी (दि. 27) होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या 2026 ते 2031 या पंचवार्षिक निवडणुकीबाबत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. सभेने मान्यता दिल्यानंतर दहा वर्षांनंतर मसापच्या निवडणुका होणार आहेत.(Latest Pune News)
परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी तीन वाजता टिळक रस्त्यावरील मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. परिषदेच्या कार्यकारिणीची मुदतवाढ 31 मार्च रोजी संपुष्टात येत असल्याने आता लोकशाही मार्गाने परिषदेची निवडणूक घेण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतला आहे. डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणुकीचा प्रस्ताव मांडून त्यास सभेची मान्यता घेण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला जाणार असल्याची शक्यता आहे.
धर्मादाय आयुक्त कार्यालयात याचिका दाखल
दरम्यान ‘मसाप’चे आजीव सभासद राजकुमार भानुदासराव धुरगुडे यांनी विश्वस्त कायदा कलम 41(अ) अंतर्गत धर्मादाय आयुक्त कार्यालयात स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. निवडणुका पारदर्शी पद्धतीने संचालित कराव्यात, संस्थेवर त्वरित प्रशासक नियुक्त करावा, संस्थेच्या निवडणूका प्रशासकाच्या नियंत्रणाखाली घ्याव्यात, अशा मागण्या राजकुमार धुरगुडे यांनी केल्या आहेत. सर्वसाधारण सभेत याचिकेची दखल घेतल्याशिवाय निवडणुकीचा निर्णय करता येणार नसल्याचे धुरगुडे यांचे म्हणणे आहे
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नव्या घटनेनुसार ही निवडणूक होणार असून, पंचाहत्तरी पार व्यक्तीला निवडणुकीमध्ये उभे राहता येणार नाही. साहित्य क्षेत्रात योगदान असलेल्या ज्येष्ठ साहित्यिकाला अध्यक्षपदाचा बहुमान दिला जात असे. कार्याध्यक्ष हे दैनंदिन कामकाजाचे प्रमुख असत. मात्र, नव्या घटनेनुसार कार्याध्यक्ष पद गोठविण्यात आले असून, कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष ही तीन पदे प्रमुख असणार आहेत.
सुनीताराजे पवार, प्रमुख कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद