Revenue Pudhari
पुणे

Minor Mineral Revenue: खेड तालुक्यात गौणखनिजातून 18.81 कोटींचा महसूल; अवैध उत्खननावर कारवाई

63 वाहनांवर दंड, थकीत 27 कोटी वसुलीसाठी प्रशासनाचा कडक बडगा

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: खेड तालुक्यात मागील आर्थिक वर्षात गौणखनिजाच्या वसुलीतून तब्बल 18 कोटी 81 लाख 69 हजार 451 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली.

तालुक्यात वाळू, मुरूम, खडीसारख्या गौणखनिजांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र, याचबरोबर अवैध उत्खनन आणि वाहतुकीचे प्रकारही समोर येत असल्याने महसूल प्रशासन सतर्क झाले आहे. चालू वर्षात अशा अवैध वाहतूक करणार्‌‍या 63 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यातून 1 कोटी 15 लाख 27 हजार 985 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

याशिवाय गौणखनिज उत्खनन व वाहतूकसंदर्भातील 42 प्रकरणांमध्ये तब्बल 27 कोटी रुपयांचा दंड थकीत आहे. या सर्व प्रकरणांवर सुनावणी पूर्ण झाल्या असून, दंड न भरलेल्या संबंधितांवर आता महसूल विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

संबंधितांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यापैकी 14 प्रकरणांचा लवकरच लिलाव केला जाणार आहे. त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तहसील प्रशासनाच्या या कारवाईमुळे महसूलवाढीसोबतच बेकायदेशीर प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खेड तालुक्याने महसूलवसुलीत आणखी एक विक्रम नोंदविला आहे. मागील आर्थिक वर्षात ई-चावडी प्रणालीअंतर्गत 100 टक्के महसूल वसुली पूर्ण करीत खेड तालुका पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. महसूल विभागाच्या कार्यक्षम नियोजनामुळे हा टप्पा गाठता आला.
प्रशांत बेडसे, तहसीलदार, खेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT