किरण दिघे
खेड शिवापूर: पूर्वीचा खेड शिवापूर-डोणजे गट व आता खेड शिवापूर-खानापूर गट झाला आहे. गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल पाहता या गटामध्ये शिवसेना (धनुष्यबाण) दोनवेळा, तर गणात तीनवेळा विजय झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने (घड्याळ) सलग दोनवेळा व गणात एकदा, तर भाजपने एकवेळा विजय मिळविला होता. मात्र, त्या वेळी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होते. सध्याची परिस्थिती पाहता या गटामध्ये पाच पक्ष झाले असून सर्वच पक्षांना विजयाची समान संधी असल्याने ही लढत तुल्यबळ होणार असल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे. त्यामुळे खेड शिवापूर-खानापूर गटात राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा रंगू लागली आहे. (Latest Pune News)
खेड शिवापूर-खानापूर गट सध्या सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. या गटामध्ये एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा ज्येष्ठ नागरिक व खासदार सुप्रिया सुळे यांना मानणारा महिलावर्ग सक्रिय आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कहीस शरदचंद्र पवार गटाने जोरदार तयारी केली आहे. दुसरीकडे, सलग दोनवेळा व पूर्वी एकदा जिंकणारा शिवसेना पक्ष अधिक सक्रिय झाला आहे.
मागील काही महिन्यांमध्ये या भागात महायुतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. त्याचप्रमाणे धनुष्यबाणाला मानणारा तरुणवर्गसुद्धा अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. एवढे असूनही पहिल्यांदा महायुती म्हणून लढावे, अशी गळ घालणार असल्याचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या भागात फिरून एकटे लढण्यासाठी चाचपणी केली आहे. भाजपने बखिंचा आदेश दिल्याप्रमाणे काम करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. शिवसेना (उबाठा) गटामधील चर्चा अजूनही ऐकायला मिळाली नाही. मात्र, ते देखील निवडणूक लढण्याच्या जोरदार तयारीत असल्याचे गावभेट दौऱ्यावरून दिसून येत आहे.
दुसरीकडे, खेड शिवापूर गण हा ओबीसी महिलेसाठी आरक्षित असून, येथेदेखील तुल्यबळ लढत होण्याचे संकेत दिसत आहेत. सर्वच पक्ष या गणासाठी तयारी करीत असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.
आमच्याकडे अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा आदेश आला, तर इच्छुकांच्या बैठका घेऊन मार्ग काढला जाऊन एक दिलाने निवडणुका लढविल्या जातील, मार्ग न निघाल्यास एकटे लढण्याची तयारी केली आहे.त्र्यंबक मोकाशी, खडकवासला विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
मी स्वतः महायुतीसाठी अजित पवार व आमदार भीमराव तापकीर यांच्याशी चर्चा करून विनंती करणार आहे, यावर काही निष्कर्ष निघाला नाही तर आम्ही निवडणूक जिंकण्याची संपूर्ण तयारी केली आहे.रमेश कोंडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
सध्याची परिस्थिती पाहता हा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा आहे; किंबहुना या अगोदर मतदारांनी तसा कल दिला आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहोत.राजेंद्र पवार, खडकवासला विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
निवडणुकीची तारीख अजूनही जाहीर झालेली नाही. त्यामुळे वरिष्ठांशी चर्चा झाली नाही. आगामी काळात पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील, त्याप्रमाणे एकनिष्ठेने निवडणुकीला सामोरे जाणार आहे.दीपाली वाव्हळ, खडकवासला विधानसभा महिला सरचिटणीस, भाजप