Leopard Attack: तीन बिबट्यांच्या हल्ल्यात बैल ठार; वन विभागाने पकडला दहशत माजवणारा बिबट्या
नारायणगाव: पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील काकडपट या ठिकाणी ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुरांचा बैल तीन बिबट्यांनी ठार केल्याची माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली. दरम्यान, पिंपरी पेंढार परिसरामध्ये दहशत माजवणारा बिबट्या वन खात्याने जेरबंद केला आहे. (Latest Pune News)
१ साखर कारखाने नोव्हेंबरदरम्यान सुरू होणार असल्याने ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या ठिकठिकाणी कोप्या करून वास्तव्य करीत आहे. पिंपळवंडी येथील काकडपट या ठिकाणी मयूर वाघ यांच्या घराजवळ ऊसतोडणी मजुरांच्या कोपीजवळ बांधलेल्या बैलावर मध्यरात्री तीन बिबट्यांनी हल्ला केला, त्यात बैल ठार झाला.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी गेले. त्यांनी परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला. मयूर वाघ यांच्या घराजवळ बिबट्याला पकडण्यासाठी एक महिन्यापूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी मध्यरात्री बिबट्या जेरबंद झाला. त्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, पिंपरी पेंढार परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्या पकडावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केल्यानंतर चार दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला. त्यात मंगळवारी (दि. २८) पहाटे बिबट्या जेरबंद झाला. त्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलविण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली. पकडलेला बिबट्या नर असून, त्याचे वय सुमारे सहा वर्षांचे असावे, असे त्यांनी सांगितले.

