

चाकण: चाकणजवळील नाणेकरवाडी (ता. खेड) येथे एका तरुणाचा मोटारीमध्येच गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि. २८) सकाळी चालकाच्या जागेवर बसलेल्या स्थितीतील मृतदेह रक्ताने भरलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर उघडकीस आला आहे. विकास लक्ष्मण नाणेकर (वय ४४, रा. सुदाम्याचे पोहे अपार्टमेंटशेजारी, नाणेकरवाडी चाकण, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्रीच्या वेळी ही घटना घडली असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Pune News)
याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बबुशा ऊर्फ बाबाजी ज्ञानेश्वर नाणेकर (वय ४५, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) व योगेश सौदागर जाधव (वय २९, रा. बबुशा नाणेकर यांची खोली, नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. नाणेकरवाडीचे पोलिस पाटील राजू शांताराम नाणेकर यांनी याबाबत चाकण पोलिसांत फिर्याद दिली.
नाणेकर यांच्या फिर्यादीनुसार, नाणेकरवाडी ते एमआयडीसी रस्त्यावर ह्युदाई कंपनीच्या मोटारीत (एमएच १४ एमक्यू ४७८३) विकास नाणेकर यांचा गळा चिरून खून करण्यात आला. चाकण पोलिसांत याबाबत सुरुवातीला अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने तातडीने याबाबतच्या तपासाची चक्रे फिरवली. विकास नाणेकर यांचा खून करून पळालेले आरोपी मावळ तालुक्यात नानोली भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नानोली तर्फे चाकण (ता. मावळ) येथे पोहचलेल्या पोलिसांनी शुभम बाळासाहेब भोसले यांच्या घराच्या समोरून बबुशा नाणेकर व योगेश जाधव या दोघांना ताब्यात घेतले.
सुरुवातीला त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या दोघांना पोलिसांनी मावळ तालुक्यातून ताब्यात घेऊन युनिट ३ पथकाच्या कार्यालयात आणले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. विकास नाणेकर आणि बबुशा नाणेकर यांच्यात जमिनीचा वाद होता. सोमवारी (दि. २७) दोघांमध्ये यावरूनच वाद झाले. याच रागातून बबुशा नाणेकर व त्याचा साथीदार योगेश जाधव यांनी संगनमताने चाकूच्या साह्याने विकास नाणेकर याची गळा चिरून हत्या केल्याची कबुली दिली असल्याचे गुन्हे शाखा युनिट ३ यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान चाकण ग्रामीण रुग्णालयात विकास नाणेकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मंगळवारी (दि. २८) सकाळी आणण्यापूर्वी पोलिसांकडून पंचनामा व घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलहस निरीक्षक व पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेतील काही व्यक्तींचा सहभाग आहे का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नवीन मोटारीत चिरला गळा
विकास नाणेकर यांनी दसऱ्याला नवीन गुंदाई कंपनीची मोटार कार खरेदी केली होती. याच मोटारीत त्यांचा अत्यंत निघृण खून करण्यात आला. विकास यांच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केल्याने मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. विकास नाणेकर हे पोलिसमित्र व इनफॉर्मर होते. परिसरातील विविध घटनांची माहिती त्यांच्याकडून पोलिसांना मिळत होती. पोलिसमित्र असल्याने पोलिसांसोबतच त्यांचा अधिकाधिक वावर होता.