Khed Panchayat Samiti Pudhari
पुणे

Khed Panchayat Samiti Sabhapati Election: खेड पंचायत समितीत सभापती निवडीसाठी हालचालींना वेग

शिवसेनेचे सदस्य राजकीय सहलीवर; बाजार समिती सभापती बदलाच्या चर्चांनी राजगुरुनगरात रंगले राजकारण

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या चुरशीच्या निवडणुकीनंतर खेड बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. तर आठवडाभरात होणाऱ्या पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे शिवसेना सदस्य राजकीय सहलीला गेले आहेत.

खेड तालुक्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना (उबाठा)निर्विवाद वर्चस्व मिळाले.१६ सदस्यांपैकी ९ सदस्य निवडून आले आहेत.असे असले तरी मागच्या पंचवार्षिक काळात मध्यंतरात पक्षाचे सदस्य फुटून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली समितीत सत्ता स्थापित करण्यात आली होती.हा अनुभव विचारात घेऊन शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित शिवसेना सदस्यांची राजकीय सहल काढून सुरक्षितता बाळगण्यात आल्याचे मानले जात आहे.

पंचायत समितीमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी सभापती पद राखीव झाले आहे.शिवसेनेच्या पाच महिला निवडून आल्या आहेत.तर चार पुरुष सदस्य आहेत.पक्षाच्या सर्व महिलांना सभापती पद आणि पुरुषांना उपसभापती पद दिले जाऊ शकते.मात्र सर्वप्रथम कोण? याची उत्सुकता तालुक्यात लागुन राहिली आहे.योग्य व्यक्तिमत्व, भागाचा विचार आणि राजकीय आडाखे यावर आमदार बाबाजी काळे यांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले.८ पैकी ५ सदस्य निवडून आले.अत्यंत अटीतटीच्या आणि स्वतःचा मतदार संघ सोडुन निवडणुकीत उतरलेल्या बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांना मोठा विजय मिळाला.त्यांना आमदार काळे, पक्ष आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी साथ दिली.यश मिळाल्यानंतर आणि अगोदर आपसात ठरल्यानुसार सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांच्या कडून खेड कृषि बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत असून नवीन सभापती निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. नवीन सभापती निवडीदरम्यान आमदार बाबाजी काळे यांचे भाचे, संचालक अनुराग जैद यांना सभापती पदाची संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार काळे यांच्या भगिनी राजश्री जैद यांना पक्षाने पाईट - आंबेठाण गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली होती.त्यांचा या गटात पराभव झाला . शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनिता बुट्टे पाटील येथुन अल्प मतांनी विजयी झाल्या. बहिणीचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाच्याला सभापती पद देऊन हे शल्य कमी करण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांच्या तालुक्यातील समर्थकांनी आग्रह धरल्याच्या चर्चा आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.बाजार समितीची सत्ता माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या ताब्यातून आमदार बाबाजी काळे यांच्याकडे झुकली आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या राजकारणातून जयसिंग भोगाडे आणि विठ्ठल वनघरे हे दोन संचालकही काळे यांच्या गोटात गेल्यात जमा आहेत. स्वतः दिलीप मोहिते पाटील आणि एखादा संचालक वगळता मोहिते पाटील यांच्या बाजूने संख्याबळ उरलेले नाही.

ठाकरे शिवसेनेकडे विद्या मोहिते, कविता राक्षे, सारिका गोगावले, रुपाली कांबळे व गौरी मुऱ्हे या पाच महिला आहेत. ज्ञानेश्वर ढेरंगे, दिलीप डुबे किंवा मंगेश सावंत यांच्या गळ्यात उपसभापती पदाची माळ पडू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT