राजगुरुनगर: खेड तालुक्यातील सेझ प्रकल्पात असलेल्या आणि नव्याने होणाऱ्या कंपनीमध्ये काम मिळवण्यासाठी अनेकदा टोळी युद्ध झाली आहेत. गेल्या काही वर्षांत खुनाच्या घटनाही घडल्या आहेत. त्यावर पोलिस यंत्रणेला नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशातच कनेरसर गावात बुधवारी (दि. १८) एका इंजिनिअरिंग कंपनीसमोर लँड डेव्हलपमेंटच्या कामावरून वाद निर्माण होऊन १० ते १५ जणांच्या जमावाने एका २२ वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, शेखर पोपट तांबे (वय २२, रा. वरुडे, ता. खेड) हा शेती आणि लँड डेव्हलपमेंटचा व्यवसाय करतो. बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास कनेरसर येथील के. अॅन्ड के. कॉन्टेक इंजीनिअरिंग प्रा. लि. या कंपनीसमोर त्याचे लँड डेव्हलपमेंटचे काम सुरू होते. त्या वेळी आरोपींनी कंपनीचे अधिकारी सुंदरम यांच्याशी याच कामावरून वाद घातला. शेखर तांबे याने सुंदरम यांना वाचवण्याचा मार्ग काढून त्यांना जेवणासाठी घरी जाण्यास सांगितले आणि वाद थांबवण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी आरोपी सिध्दार्थ झोडगे याने "तुला खूप माज आला आहे, आम्हाला येथे काम करायचे आहे" असे म्हणत शिवीगाळ करून हल्ला केला. त्याने लाकडी काठीने पाठीवर आणि डाव्या खांद्यावर मारहाण केली. जय चौधरी याने तोंडावर मुक्का मारून तरुणाला खाली पाडले आणि लाथा मारल्या. नंतर दगडाने डोक्यावर मारहाण केल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. याशिवाय मनोज मकाळे, सिद्धार्थ झोडगे, कमलेश दौंडकर, संकेत दौंडकर, स्वागत माशेरे (सर्व रा. कनेरसर, ता. खेड) , जय चौधरी, (रा. पाबळ, ता. शिरूर) आणि इतर १० ते १५ अज्ञात इसमांनीही लाकडी काठी, दगड आणि हाताने-लाथांनी मारहाण केली. या हल्ल्यात बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिसोदे हे अधिक तपास करीत आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम ३४७ (बेकायदेशीर जमाव), ३२३ (स्वेच्छेने दुखापत), ३२४ (घातक शस्त्राने दुखापत), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, आरोपींचा शोध घेतला. जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.