खेड: जैदवाडी (ता. खेड) येथे पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या एका कारखान्याच्या सातत्याने निघणाऱ्या दाट काळ्या धुरामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यभरातील भक्तीचे श्रद्धास्थान असलेल्या सौरंग्या दत्त मंदिर परिसरात हा कारखाना असल्याने भाविकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पसरणाऱ्या या धुरामुळे हवेत दुर्गंधी पसरते, श्वास घेण्यास त्रास होतो, डोळ्यांना जळजळ आणि घसा खवखवण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
या परिसरात जिल्हा परिषद शाळा असल्याने लहान मुलांना, तसेच वृद्ध आणि आजारी नागरिकांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात आदिवासी ठाकर वस्त्या असून या नागरिकांना फुफ्फुसाचे आजार वाढले आहेत. पठार भाग असून येथे रब्बी हंगामात बटाटा पीक घेतले जाते.
बटाट्याच्या शेतीसह इतर पिकांवर धुराचा विपरीत परिणाम होत असल्याने शेतकरी देखील अडचणीत आले आहेत. सातगाव पठारावरील हा भाग बटाट्याचा प्रमुख आगर मानला जातो, परंतु प्रदूषणामुळे शेती आणि स्थानिक हॉटेल व्यवसायाला देखील अडचणी येत आहेत. याशिवाय वन्यजीवांनाही धोका निर्माण झाला आहे.
ॲग््राीकल्चर झोन असलेल्या या भागात अशा कारखान्यांना परवानगी कशी मिळाली किंवा ते अवैधपणे चालू आहेत का? याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग््राामस्थ संतप्त झाले आहेत. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, लवकरात लवकर कारखान्याची तपासणी करून प्रदूषण थांबवावे, अशी एकमुखी मागणी होत आहे.
माजी सरपंच राजेंद्र कातोरे यांनी कारखान्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रदूषण नियंत्रण नियमांची कठोर अंमलबजावणी न झाल्यास ग््राामस्थ मोठे आंदोलन उभारणार आहेत. भक्तीचे श्रद्धास्थान असलेल्या दत्त मंदिर परिसरात आणि शाळेजवळ असलेल्या या कारखान्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. प्रशासनाने लक्ष घालावे, अन्यथा रस्त्यावर उतरू.राजेंद्र कातोरे, माजी सरपंच, जैदवाडी