दीपक नायक, नितीन वाबळे
एकीकडे खराडीसारखा आयटी पार्क असलेला विकसित भाग, तर दुसरीकडे विकासापासून दूर असलेला वाघोली परिसर, असे विकासाचा असमतोल दाखविणारे चित्र खराडी-वाघोली या प्रभागात आहे. खराडीतील पाणीटंचाईचा प्रश्न अद्यापही कायम असून, त्यासाठी सोसायटीधारक नागरिकांना कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. तर दुसरीकडे वाघोलीकरांना रस्ते, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी आणि ड्रेनेजव्यवस्था, असा प्रत्येक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे.
महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर विकासाच्या मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या नागरिकांना आज निराशेचा सामना करावा लागत आहे. ‘ग्रामपंचायतीच्या काळात तरी व्यवस्था काही प्रमाणात चांगली होती,’ अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. महापालिकेकडे कर भरूनही समस्या सुटत नसल्याने प्रशासनाविरोधात असंतोष दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यात पूरस्थिती, अर्धवट नाले, ड्रेनेजचा अभाव, रस्त्यावर वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी, अतिक्रमणे, अपुरा पाणीपुरवठा, खंडित वीज, कचऱ्याचे ढीग, पदपथांची दुरवस्था, पार्किंगची कमतरता आणि वाहतूक कोंडी या समस्यांनी नागरिकांचे जगणे त्रासदायक झाले आहे. स्मशानभूमीचा प्रश्न, बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि अंतर्गत रस्त्यांची स्थिती देखील अधिकच बिकट झाली आहे.
वाघोली-आव्हाळवाडी रस्त्यासह ठिकठिकाणी साचणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बहुतांश ठिकाणी ड्रेनेजलाइन नसल्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर सातत्याने सांडपाणी वाहत असते. दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. केसनंद रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघात वाढले आहेत.रणजित अडसूळ, रहिवासी
काही महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्तांनी आमदार व स्थानिक प्रतिनिधींसह पुणे-नगर महामार्गाची पाहणी करून अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अतिक्रमणे हटविण्यात आली होती. परंतु, काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली. वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप कायम असून, नागरिकांच्या संयमाचा अंत होत आहे. दरम्यान, या प्रभागात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. काही ठिकाणी रहिवाशांना दररोज पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अनधिकृत बांधकामांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरातील पायाभूत सुविधांवर ताण येत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
कचरा, अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था, पार्किंगचा अभाव, वाहतूक कोंडी, पदपथाची दुरवस्था आदी समस्यांकडे स्थानिक नेत्यांसह महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.बालाजी पाटील, रहिवासी
वाघोली परिसरात सार्वजनिक शौचालये, क्रीडांगणे, जलतरण तलाव अशा मूलभूत सुविधा अद्यापही उपलब्ध नाहीत. तसेच, अहिल्यानगर महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून स्कायवॉकची मागणी प्रलंबित आहे. यामुळे रस्ता ओलांडताना नागरिक, विशेषतः महिला व लहान मुले, जीव मुठीत घेऊन रस्ता पार करताना दिसतात. परिणामी, अपघातांचा धोका वाढला असून, अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे या महामार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे.
समाविष्ट गावांवरील चारपट कर आकारणीऐवजी दुप्पट कर आकारणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. समान पाणीपुरवठा योजनेतून लोहगाव आणि वाघोलीसाठी 50 ठिकाणी पाण्याच्या टाक्यांची उभारणी केली आहे. ड्रेनेज आणि पावसाळी वाहिन्यांची 17 कोटींची कामे प्रगतिपथावर आहेत. तसेच प्रलंबित रस्ते, जकात नाका ते वाघोली स्ट्रीट लाइट, महिला बचत गट, बाह्यवळणे आणि डीपी रस्त्यांसाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.शांताराम कटके.
तर, खराडी भागातील आयटी पार्कमुळे या भागाचा विकास झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, पाण्याचा गंभीर प्रश्न या भागात कायम आहे. सोसायटीधारकांना पाण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागत असून, टँकर लॉबीतून कृत्रिम पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण केला जात असल्याचा आरोप येथील रहिवाशांकडून केला जात आहे. याशिवाय कचरा गोळा करण्यासाठी निर्माण झालेली खासगी व्यवस्था त्यासाठी द्यावे लागणारे अवाच्या सव्वा शुल्क, यामुळे येथील नागरिकांमध्ये रोष आहे. याशिवाय एका भागात नागरिकांसाठी मोठ्या उद्यानांची कमतरता आहे. निवडणुकीत प्रचारात हे सर्व मुद्दे कळीचे ठरण्याची शक्यता आहे. खराडी, वाघोलीतील समस्या सुटणार तरी कधी? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. एकंदरीतच, विकासाच्या नावाखाली अद्याप केवळ घोषणा झाल्या, प्रत्यक्षात मात्र खराडी-वाघोली अद्यापही मागासलेलाच भाग आहे. या प्रभागाचा खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकास होण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याच्या नागरिकांच्या भावना आहेत.
शासन नियुक्त सदस्य, महापालिकासांडपाणी सोडल्या जाणाऱ्या ठिकाणी ’नंदनवन’ उभारून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांसाठी श्री प्रभू रामचंद्र उद्यानाची निर्मिती केली आहे. आव्हाळवाडी-मुळा-मुठा परिसरात साडेसहा कोटी रुपयांची सहा किलोमीटर मुख्य ड्रेनेजलाइनचे काम केले आहे. अंतर्गत रस्ते तसेच शेड उभारून भाजी मंडई चिखलमुक्त केली आहे. पाणीपुरवठा योजना, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.संदीप सातव, शासन नियुक्त सदस्य, महापालिका
प्रभागात या भागांचा समावेश
चंदननगर, खुळेवाडी, थिटेवस्ती, खराडी, उबाळेनगर, बाईफ रोड, वाघोली आरोग्य केंद्र, आठवडे बाजार परिसर, केसनंद रोड, आयव्ही इस्टेट आदी.
प्रभागात झालेली विकासकामे
श्री प्रभू रामचंद्र उद्यानाची निर्मिती
वाघोली-मुळा मुठा मुख्य ड्रेनेजलाइन
अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरुस्ती
अंतर्गत रस्त्यांवर पथदिवे बसविले
प्रभागातील प्रमुख समस्या वाघोली येथे होणारी वाहतूक कोंडी
पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती
कचरा व्यवस्थापनाचा अभाव
पाण्याच्या टाक्यांची कामे रखडली
रस्त्यांसह पदपथांची दुरवस्था
पदपथ आणि रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे
मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण