Garbage Dumping Pudhari
पुणे

Khanapur Garbage Problem: सिंहगडच्या खानापूर गावाला कचऱ्याचा विळखा; रस्ते, गल्ल्या अन् ओढे-नाले झाले ‘डम्पिंग ग्राउंड’

दररोज एक टन कचरा; महापालिकेने कचरा घेणे बंद केल्याने ग्रामस्थ त्रस्त, दुर्गंधी अन् डास-माशांमुळे आरोग्याचा प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: सिंहगड भागातील खानापूर गावाला कचऱ्याचा विळखा पडला आहे. मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांसह गल्ली बोळात, ओढे-नाल्यांना कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. इतकी गंभीर स्थिती निर्माण झाल्‍याने स्‍थानिक रहिवाशांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे.

पाऊस तसेच सांडपाण्यामुळे कचरा सडून दुर्गंधी पसरली आहे. माशा, डास अशा किटकांची पैदास वाढली आहे. त्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असल्याने शेकडो रहिवाशांचे आरोग्य ऐरणीवर आले आहे. दुसरीकडे बेशिस्त नागरिक सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर सडलेला कचरा, अन्न, मांस, मृत कोंबड्या, जनावरे फेकून देत आहेत.

खानापूर गावची जवळपास सात हजार लोकसंख्या आहे. पश्चिम हवेली सिंहगड-पानशेत भागातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने गावातील पुणे-पानशेत रस्त्यावर व्यापारी केंद्र तयार झाले आहे. राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकासह पतसंस्था, वीज कार्यालय, मंडल महसूल कार्यालय, परिमंडळ वन कार्यालय, आरोग्य केंद्र आदी संस्था गावात आहेत. त्यामुळे गावात स्थानिक तसेच बाहेरील नागरिकांची वर्दळ वाढली आहे. गावात दररोज एक टन कचरा तयार होत आहे. यात प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीकडे जमीन उपलब्ध नाही. त्यामुळे गावातील कचरा ग्रामपंचायत गोळा करून महापालिकेच्या कचरा डेपोत टाकला जात असे. मात्र, महापालिकेने खानापूरमधील कचरा घेणे बंद केले आहे. तेव्हापासून कचरा गावातच पडून आहे.

खानापूरच्या सरपंच शिल्पा गायकवाड म्हणाल्या, गावातील कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीने दोन कचरा गाड्या घेतल्या आहेत. गावात कचरा प्रक्रिया प्रकल्प नसल्याने दररोज गोळा होणारा कचरा महापालिका कचरा डेपोला दिला जात असे. पालिका कचरा घेत नसल्याने कचरा पडून आहे. याबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

विधिमंडळात पडसाद उमटूनही प्रशासनाने दुर्लक्ष

गावाच्या एका बाजूला सिंहगड किल्ल्याच्या डोंगररांगा, तर दुसऱ्या बाजूला खडकवासला धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी गावात गावरान तसेच सरकारी जमीन उपलब्ध नाही. वाढती लोकसंख्या, रहदारीबरोबर गावात कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांसमोर मोठे आव्हान उभे आहे. मैलापाणी, सांडपाण्याचीही अशीच गंभीर स्थिती आहे. याबाबत विधिमंडळात वेळोवेळी पडसाद उमटूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

वर्गीकरण करून कचऱ्यावर प्रक्रिया करावी

खडकवासला विधानसभा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष शरद जावळकर म्हणाले, ग्रामपंचायतीच्या कचरा गाड्या अनेक दिवसांपासून कचरा गोळा करत नाहीत. गाड्या तशाच धूळखात उभ्या आहेत. सर्वत्र मोठमोठे कचऱ्याचे ढीग साठले आहेत. डास, माशांची पैदास, दुर्गंधी वाढल्याने लहान मुले नागरिक आजारी पडत आहेत. आरोग्यास हानिकारक असलेला कचरा दररोज गोळा करावा. कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT