Khadakwasla Dam Pudhari
पुणे

Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळीत ५९ टक्के पाणीसाठा; पावसाची विश्रांती, वाढ मात्र संथ

पानशेत, वरसगाव, टेमघर परिसरात तुरळक पाऊस; २४ तासांत केवळ ०.१६ टीएमसी पाण्याची वाढ

पुढारी वृत्तसेवा

वेल्हे: गेल्या चार दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत, वरसगाव, टेमघर धरण क्षेत्रात पावसाळी वातावरण आहे. तुरळक पाऊस पडत आहे, मात्र जोरदार पाऊस पडत नाही. त्यामुळे धरणसाठ्यात फारशी वाढ झाली नाही. धरण साखळीत रविवारी (दि. १९) सायंकाळी पाच वाजता १७.२६ टीएमसी म्हणजे ५९.२१ टक्के साठा झाला होता.

घाटमाथ्यालगतच्या पानशेत-मुठा मोसे खोऱ्यात थोड्याशा विश्रांतीनंतर रिमझिम सुरू आहे. ओढ्या-नाल्यांचे प्रवाहही मंदावले आहेत. त्यामुळे धरणसाठ्यात अल्प प्रमाणात साठा होत आहे. गेल्या २४ तासांत धरण साखळीत केवळ ०.१६ टीएमसी इतकी वाढ झाली. तर, शनिवारी (दि. १८) सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत १७.१० टीएमसी पाणी होते.

खडकवासला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख म्हणाले, की पानशेत, वरसगाव व टेमघर धरणातून पाणी सोडले जात नाही. तिन्ही धरणांत शंभर टक्के साठा केला जात आहे. खडकवासला धरणातून शहर व जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी सोडले जात आहे.

या पाण्याची तूट सध्या पडत असलेल्या पावसामुळे काही प्रमाणात भरून निघत आहे. दरम्यान, रविवारी दिवसभरात टेमघर येथे १२ , खडकवासला येथे १ ,वरसगाव व पानशेत येथे प्रत्येकी ४ मिलिमीटर पाऊस पडला.

रविवारचा पाणीसाठा

  • खडकवासला १.४० ७०.९०

  • पानशेत ६.८२ ६४.०२

  • वरसगाव ७.५० ५८.४८

  • टेमघर १.५५ ४१.७०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT