Khadakwasla Dam Pudhari
पुणे

Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा ५८ टक्क्यांवर; पुणेकरांसाठी पाणीपुरवठ्याचा दिलासा

पावसाचा लपंडाव कायम; धरणसाखळीत केवळ ०.०७ टीएमसी वाढ, मुठा कालव्यातील विसर्ग वाढवून १,००५ क्युसेक

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: रायगड जिल्ह्याच्या घाटमाथ्यासह पानशेत, मोसे, मुठा खोऱ्यात शुक्रवारी (दि. १७) दिवसभर पावसाचा लपंडाव सुरू राहिल्याने खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात केवळ ०.०७ टीएमसीची वाढ झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत खडकवासला धरण साखळीत १६.९४ टीएमसी, म्हणजेच ५८.१३ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला.

धरणसाखळीच्या लाभक्षेत्रातील हवेली, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील १५ लाखांहून अधिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन खडकवासला धरणातून मुठा कालव्यात सोडण्यात येणारा विसर्ग वाढवून १,००५ क्युसेक करण्यात आला आहे.

शुक्रवारी दिवसभरात टेमघर येथे २३ मि.मी., पानशेत व वरसगाव येथे प्रत्येकी १४ मिमी, तर खडकवासला येथे २ मि.मी. पावसाची नोंद झाली. खडकवासला धरणातून पुणे शहरासाठी ४२२ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

यापूर्वी ७ जुलैपासून पालखी सोहळा आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या गरजांसाठी मुठा कालव्यात ७०० क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. लाभक्षेत्रातील हवेली, दौंड आणि इंदापूर तालुक्यांत तीव्र उष्णतेमुळे निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी विसर्गात वाढ करण्यात आल्याचे खडकवासला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले.

११ जुलैनंतर प्रथमच वाढ

११ जुलैपासून ५७ टक्क्यांवर स्थिर असलेला खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा अखेर शुक्रवारी ५८.१३ टक्क्यांवर पोहोचला. घाटमाथा आणि पानशेत-मोसे-मुठा खोऱ्यात रिमझिम पाऊस व अधूनमधून उघडीप असल्याने नद्या, ओढे आणि नाल्यांतून धरणांकडे पाण्याची आवक मंदगतीने सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT