

वाघोली: गेल्या ७ वर्षांपासून रखडलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) २३ कोटी रुपयांच्या वाघोली वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पाणी अखेर वाघोलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे वाघोली परिसरातील पाणीटंचाई दूर होण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल पडले आहे. मात्र, नागरिकांना प्रत्यक्ष नळाद्वारे पाणी मिळण्यासाठी आणखी दोन ते अडीच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वाघोली व आव्हाळवाडी या परिसराची तहान भागवण्यासाठी २०११ मध्ये पहिल्यांदा या पाणी योजनेची रूपरेषा (प्लॅनिंग) तयार करण्यात आली होती. त्यानंतर २०१८ मध्ये या योजनेला अधिकृत मंजुरी मिळाली आणि २०१९ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. ही योजना दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु, जलवाहिनी टाकण्यास झालेला स्थानिक विरोध, विविध तांत्रिक अडचणी आणि कामात येणारे सातत्यपूर्ण अडथळे यांमुळे ही योजना तब्बल ७ वर्षे रखडली होती. अखेर वढू बुद्रुक येथील भीमा नदीवरील बंधार्यापासून ११ किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी टाकून हे पाणी वाघोलीत आणण्यात प्रशासनाला यश आले आहे.
पाच दशलक्ष लिटर क्षमतेच्या या योजनेचा फायदा वाघोलीतील बकोरी रस्ता, वाघेश्वरनगर, विठ्ठलवाडी, मुख्य वाघोली गाव आणि परिसरातील हजारो नागरिकांना होणार आहे. यामुळे दर उन्हाळ्यात आणि वर्षभर होणारी टँकरची पळवापळवी थांबण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी नगरसेविका रत्नमाला सातव यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. योजना पूर्णत्वाकडे जात असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्रत्यक्ष पाणी कधी मिळणार?
'पीएमआरडीएच्या कार्यकारी अभियंता अनिता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमा नदीचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले असून, आता पुढील तांत्रिक कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. सध्या आलेले पाणी शुद्धीकरण प्रक्रियेतून नेले जाईल. त्यानंतर मुख्य पंप, मोटारी आणि १५ हजार मीटर लांबीच्या अंतर्गत जलवाहिन्यांची गळती व दाब तपासणी केली जाईल. हे सर्व तांत्रिक काम पूर्ण झाल्यानंतर साडेअकरा लाख लिटर क्षमतेच्या मुख्य टाकीतून वाघोलीकरांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू केला जाईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी पुढील दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागेल.
दृष्टिक्षेपात योजना
योजनेची मंजुरी : २०१८
एकूण खर्च : २३ कोटी रुपये
पाणीसाठवण क्षमता : ५ दशलक्ष (५० लाख) लिटर
पाण्याचा मुख्य स्रोत : वढू बुद्रुक येथील भीमा नदीचा बंधारा
मुख्य जलवाहिनीची लांबी : ११ किलोमीटर
अंतर्गत जलवाहिनी (वितरण नेटवर्क) : १५,००० मीटर