Khadakwasla Dam Pudhari
पुणे

Khadakwasla Dam Water Storage: पुण्यात मुसळधार पाऊस, पण धरणक्षेत्र कोरडेच! खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात घट

चारही धरणांत २३.४७ टीएमसी म्हणजे ८०.५२ टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत ४.९३ टीएमसीने तूट

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: पुणे शहर आणि जिल्ह्यातील सुमारे एक कोटी नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोटक्षेत्राला अवकाळी पावसानेही हुलकावणी दिली. खडकवासला धरणाच्या भिंतीखाली गेल्या चार-पाच दिवसांपासून पाऊस पडत असताना धरणक्षेत्रात मात्र पावसाचा थेंबही पडत नसल्याचे चित्र आहे.

परिणामी, धरणसाठ्यात नव्याने भर पडण्याऐवजी शेती आणि पिण्यासाठी पाणी सोडले जात असल्याने साठ्यात सातत्याने घट होत आहे. खडकवासला धरणसाखळीत सोमवारी सायंकाळी पाच वाजता २३.४७ टीएमसी म्हणजे ८०.५२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ४.९३ टीएमसी कमी पाणीसाठा आहे.

पाण्याची तूट झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. सोमवारी सकाळपासून खडकवासला धरणाच्या भिंतीखालील खडकवासला, नांदेड, धायरी, किरकटवाडी आणि सिंहगड रस्ता परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रस्ते जलमय झाले, तर ओढ्या-नाल्यांनाही पूर आल्याचे चित्र दिसून आले.

खडकवासला धरणाच्या भिंतीवर १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली; मात्र टेमघर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या पाणलोटक्षेत्रात एक मिलिमीटरही पाऊस झाला नाही. खडकवासला धरणाचे शाखा अभियंता वीरेश राऊत म्हणाले, ‘खडकवासला धरणाच्या भिंतीखालील परिसरात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस असल्याने धरणसाठ्यात वाढ झालेली नाही.’

दरम्यान, पानशेत आणि वरसगाव धरणांतून प्रत्येकी ६००, तर टेमघर धरणातून २६० क्युसेक पाणी खडकवासला धरणात सोडले जात आहे. या विसर्गामुळे तिन्ही धरणांतील पाणीसाठ्यात घट होत आहे. खडकवासला धरणाची पाणीपातळी या धरणांतून होणाऱ्या विसर्गावर अवलंबून आहे. जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे चारही धरणे शंभर टक्के भरली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने आणि आता अवकाळी पावसानेही धरणक्षेत्राकडे पाठ फिरवल्याने पाणीसाठ्याची चिंता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT