Khadakwasla Dam Pudhari File Photo
पुणे

Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळीत गतवर्षीपेक्षा ६.२९ टीएमसी पाणी कमी; पुण्याच्या पाणी नियोजनाची चिंता वाढली

सध्या २१.२९ टीएमसी म्हणजे ७३.०४ टक्के साठा शिल्लक; ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे जलसंपदा विभागासमोर आव्हान

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: दुष्काळाचे सावट गडद होत असताना पुणे शहर आणि जिल्ह्यातील सुमारे १ कोटी नागरिकांसह हजारो हेक्टर शेतीची तहान भागविणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा दिवसेंदिवस खालावत आहे. पावसाळा संपून दीड महिन्याहून अधिक काळ लोटला असतानाही १०० टक्के भरून वाहिलेली धरणसाखळी सध्या गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ६ टीएमसीने मागे आहे.

त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या आवर्तनांचे नियोजन करताना जलसंपदा विभागाची मोठी कसोटी लागणार आहे. गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर २०२६) खडकवासला धरणसाखळीत २१.२९ टीएमसी म्हणजेच ७३.०४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी याच दिवशी २७.५८ टीएमसी म्हणजेच ९४.६३ टक्के पाणीसाठा होता.

यंदा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ६.२९ टीएमसी पाणीसाठा कमी असून, टक्केवारीतही मोठी घट झाली आहे. शेतीला टप्प्याटप्प्याने आवर्तन देण्याऐवजी १५ जुलैपासून सलग आवर्तन सोडण्यात येत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन आणि उन्हाळी आवर्तन देण्याबरोबरच सुमारे १ कोटी नागरिकांची तहान भागविण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

अधिकारी म्हणतात...

खडकवासला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख म्हणाले, 'पिण्याच्या तसेच शेतीच्या पाणीवाटपाचा निर्णय कालवा सल्लागार समिती घेणार आहे. त्यांच्या आदेशानुसार पाण्याचे नियोजन केले जात आहे.' तर खडकवासला धरणाचे शाखा अभियंता विरेश राऊत म्हणाले, 'सध्या खडकवासला धरणातून सुरू असलेले शेतीचे रब्बी आवर्तन येत्या ३ ते ४ दिवसांत बंद करण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाने पाणीबचत आणि काटकसरीच्या वापरावर लक्ष केंद्रित केले आहे.'

३१ ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी राखीव पाणी

पुणे महापालिकेने १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. असे असले तरी शहर आणि परिसरातील नागरिकांसह धरणक्षेत्रातील ग्रामपंचायती, शेती सिंचन संस्था, खासगी कंपन्या, हॉटेल व्यावसायिक आणि फळबागांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत आहे. दरमहा जवळपास दीड टीएमसीपेक्षा अधिक पाणी लागते. ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्यासाठी राखीव पाणीसाठा ठेवण्याचे नियोजन आहे. सध्याच्या २१.२९ टीएमसी साठ्यातून बाष्पीभवनामुळे जवळपास २ टीएमसी पाणी कमी होण्याची शक्यता असून, प्रत्यक्षात सुमारे १९ टीएमसी पाणी उपलब्ध राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT