खडकवासला: घाट माथ्यासह पानशेत-मुठा खोऱ्यात शुक्रवारी पावसाची रिमझिम वाढली. डोंगरी पट्ट्यात अधूनमधून सरी कोसळत आहेत. चार धरणांची खडकवासला साखळी शंभर टक्के भरल्याने मुठा नदीत जादा पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना खडकवासला जलसंपदा विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पावसाचा जोर कमी झाल्याने गुरुवारी (दि. ६) दुपारनंतर खडकवासलातून मुठा नदीपात्रातील विसर्ग रात्री ८ हजार ७७७ वरून २ हजार १४० क्युसेकपर्यंत कमी केला होता. मात्र, शुक्रवारी सकाळपासून पावस वाढल्याने खडकवासलातील विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली.
हवामान खात्याने १४ ऑगस्टपर्यंत घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने पावसाच्या प्रमाणानुसार जादा पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे.
शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडकवासलातून मुठा नदीपात्रातील विसर्ग ५ हजार ३५३ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. तसेच टेमघरमधून १ हजार १६१, वरसगावमधून २ हजार ८८ आणि पानशेतमधून ६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. दिवसभरात टेमघर ९, पानशेत ८, वरसगाव ७ व खडकवासलामध्ये २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
खडकवासला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख म्हणाले की, पावसाचा जोर वाढल्यास मुठा नदीपात्रात जादा पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना खबरदारी घ्यावी.