Khadakwasla Dam Underwater Technology Pudhari
पुणे

Khadakwasla Dam Underwater Technology: खडकवासला धरणात पाण्याखालील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिक; विद्यार्थी भारावले

आरओव्ही उपकरणाद्वारे धरण सुरक्षा व जलसंपदा व्यवस्थापनाची माहिती; सिंहगड परिसरातील शाळांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

वेल्हे: खडकवासला धरणाच्या पाण्याखाली वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिक पाहून सिंहगड परिसरातील शाळांतील विद्यार्थी भारावून गेले. आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने धरण सुरक्षा, जलसंपदा व्यवस्थापन व जल पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.

खडकवासला येथील केंद्रीय जलविद्युत संशोधन केंद्राच्या वतीने सामाजिक-शैक्षणिक योजनेअंतर्गत या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डीआयडी येथील पीएम श्री केंद्रीय विद्यालय, सिंहगड व खडकवासला परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रिमोट ऑपरेटेड व्हेईकल (आरओव्ही) या पाण्याखाली कार्य करणाऱ्या आधुनिक उपकरणाचे थेट प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. या उपकरणाच्या सहाय्याने पाण्याखालील संरचनांची तपासणी, धरण सुरक्षेचे मूल्यांकन व पर्यावरणीय देखरेख कशी केली जाते, याची सविस्तर माहिती देण्यात आली.

केंद्राचे संचालक डॉ. प्रभात चंद्रा यांनी पाण्याखालील आधुनिक तंत्रज्ञान, जलसंपदा व्यवस्थापन, धरण सुरक्षा व पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी अशा उपकरणांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच केंद्राचे अतिरिक्त संचालक डॉ. एम. सेल्वा बालन व शास्त्रज्ञ डॉ. के. कुमार यांनी विद्यार्थ्यांना ‌‘स्टेम‌’ (डढएच) क्षेत्रातील शिक्षण व करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले.

देशात विज्ञान, अभियांत्रिकी व उपयोजित संशोधन क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असून, भविष्यात ‌‘मेक इन इंडिया‌’ अंतर्गत स्वदेशी आरओव्ही निर्मिती शक्य असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड व राष्ट्रीय विकासाबाबत जागरूकता निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT