Hill Cutting Pudhari
पुणे

Khadakwasla Illegal Hill Cutting: खडकवासला परिसरात अवैध डोंगरफोड; प्लॉटिंगमुळे दरडींचा आणि धरणात गाळ साचण्याचा धोका

आगळंबे येथे जेसीबीने डोंगराची मोठ्या प्रमाणात तोडफोड; नागरिकांचा तीव्र विरोध, प्रशासनाकडून पंचनामा सुरू

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: खडकवासला धरणतीरावरील आगळंबे येथे प्लाॅटिंगसाठी मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे. जेसीबी मशीनच्या साहाय्याने डोंगराची लचकेताेड सुरू आहे. त्यामुळे श्रीजीत मंगल कार्यालयाजवळील अगळंबे मुख्य रस्त्यासह शेती उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या उत्खननामुळे जोरदार पावसात तोडलेल्या डोंगराचा राडारोडा वाहून खडकवासला धरणात येणार आहे.

अवैध उत्खननाबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केली आहे. विनापरवाना मोठ्या प्रमाणात डोंगर फोडून प्लाॅटिंगसाठी रस्ता तयार केला जात आहे. त्यासाठी पायथ्यापासून माथ्यापर्यंत डोंगर तोडला जात आहे. यामुळे अतिवृष्टीच्या काळात डोंगराचे उघडे पडलेले खडक, दरडी, मुरूम आणि ठिसूळ भाग उन्मळून पडण्याची भिती रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, खडकवासला धरणाच्या डाव्या तीरावरील पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर, मणेरवाडी, सोनापूर, आंबी तसेच धरणाच्या उजव्या तीरावरील कुडजे, आगळंबे, मांडवी, सांगरुणपासून जांभली आदी ठिकाणी प्लाॅटिंगसाठी मोठ्या प्रमाणात डोंगर, टेकड्या तोडल्या जात आहेत.

दोन वर्षांपूर्वी सोनापूर येथे तोडलेल्या डोंगराच्या दरडी पुणे-पानशेत रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक कोलमडली होती. प्लाॅटिंगसाठी बेकायदा डोंगर फोडून रस्ता बांधकामे सुरू आहेत. तोडलेल्या डोंगराच्या दरडी परिसरातील घरे, हाॅटेल, लोकवस्त्यांत कोसळण्याचा धोका वाढला आहे. तर दुसरीकडे प्रशासन मात्र सुस्त असल्याचे नागरिकांनी सांगितले.

आगळंबे येथे प्लाॅटिंगसाठी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या उत्खन्नाची तातडीने पाहणी करण्याचे आदेश स्थानिक तलाठ्यांना दिले आहेत. सोमवारी (दि. २९) पाहणी करून पंचनामा करण्यात येणार आहे. बेकायदा उत्खन्न केल्याचे निष्पन्न झाल्यास महसूल अधिनियम कायद्यातंर्गत संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
अर्चना निकम, तहसीलदार, हवेली तालुका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT