

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २८ जून रोजी घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेतील काही समान प्रश्न भिवंडी येथील एका व्यक्तीकडे शनिवारी (दि. २७)आढळून आल्याने टीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवार संतप्त झाले असून, वारंवार फुटणाऱ्या पेपरमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षांवरचा विश्वासच उडाला असल्याची भावना टीईटी उमेदवार तसेच काही संघटनांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दि.२८ जूनला एकूण १०२८ केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु परीक्षेच्या आदल्या दिवशीच पेपर फुटल्याची घटना घडली. त्यामुळे टीईटी उमेदवारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दोषींवर कठोर फौजदारी कारवाई
टीईटी पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून या संपूर्ण रॅकेटमधील प्रत्येक दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी. परीक्षेची नवीन तारीख विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने जाहीर करावी, विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त आर्थिक व मानसिक भार कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि राज्यातील सर्व स्पर्धा व पात्रता परीक्षांसाठी स्वतंत्र, पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित आणि सुरक्षित परीक्षा व्यवस्थापन प्रणाली तातडीने लागू करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्य शासनाकडे केली आहे.
या पूर्वीही टीईटी परीक्षेत घडलेत गैरप्रकार
टीईटी परीक्षेत गैरप्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. २०१९च्या 'टीईटी'मध्ये ७ हजार ८७४ उमेदवारांचा गैरप्रकारात सहभाग होता. २०१८च्या परीक्षेत १ हजार ६६३ उमेदवारांनी गैरप्रकार केले होते. त्यामुळे संबंधित नऊ हजारांहून अधिक उमेदवारांची परीक्षेतील संपादणूक रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या टीईटी परीक्षेवेळी मुरगुड येथील पोलिस ठाण्यात गैरप्रकाराबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या परीक्षेत ज्या उमेदवारांनी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला होता, अशा २२ उमेदवारांची परीक्षेतील संपादणूक रद्द करण्यात आली.
पक्ष फोडता फोडता आता पेपरही फुटू लागले
राज्यातील स्पर्धा परीक्षांमधील सातत्याने समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली असून, नीट परीक्षेनंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीच्या प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते रामचंद्र ऊर्फ चंदू कदम यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कदम म्हणाले, की राज्यातील लाखो विद्यार्थी आणि युवक वर्षानुवर्षे अथक परिश्रम घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, नीट परीक्षेनंतर आता टीईटीचाही पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. ही घटना केवळ गंभीर नसून राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाला तडा देणारी आहे.
सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटले, ''सरकारचे संपूर्ण लक्ष प्रशासन सक्षम करण्याऐवजी राजकीय कुरघोड्यांमध्ये गुंतले आहे. पक्ष फोडण्यात व्यस्त असलेले सरकार आता पेपर फुटण्यापासूनही वाचवू शकत नाही. पक्ष फोडता फोडता आता पेपरही फुटू लागले आहेत. ही परिस्थिती राज्याच्या शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत लाजिरवाणी आहे.''
पेपरफुटी हा केवळ एक गुन्हा नसून, लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासावर आणि त्यांच्या भविष्यावर झालेला घाला असल्याचे सांगत कदम यांनी प्रत्येक वेळी परीक्षा रद्द होणे, पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ येणे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक, आर्थिक तसेच शैक्षणिक स्तरावर होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला. टीईटी पेपरफुटीच्या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून या गैरप्रकारामागील संपूर्ण रॅकेट उघड करावे, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटणार नाही, यासाठी प्रभावी, सुरक्षित आणि पारदर्शक यंत्रणा उभारावी, अशी मागणी त्यांनी केली.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतेही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण मिळता कामा नये. राज्यातील युवकांचा शासनावरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करायचा असेल, तर सरकारने तातडीने कठोर आणि ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे रामचंद्र उर्फ चंदू कदम यांनी स्पष्ट केले.