Khadakwasla Dam Pudhari
पुणे

Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळी ९२ टक्क्यांवर; वरसगाव धरण ‘ओव्हरफ्लो’च्या उंबरठ्यावर

पानशेतमधून ६०० क्युसेक विसर्ग सुरू; नाझरे धरणातही ८१ टक्के पाणीसाठा, पुरंदरकरांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

वेल्हे: खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोटक्षेत्रात मंगळवारी (दि. २८) पावसाचा जोर ओसरला असला, तरी घाटमाथ्यावर रिमझिम सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक कायम आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणसाखळीत २६.८५ टीएमसी, म्हणजेच ९२.११ टक्के पाणीसाठा झाला असून, सर्वात मोठ्या वरसगाव (वीर बाजी पासलकर) धरणातील साठा ९०.५७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

पानशेत धरणजवळपास पूर्ण भरल्याने त्यातून ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने दुपारी २ वाजता खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रातील विसर्ग बंद करण्यात आला होता. मात्र, सायंकाळी धरणक्षेत्रात पुन्हा रिमझिम वाढल्याने सायंकाळी ७ वाजता मुठा नदीत १,७१२ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला. गेल्या २४ तासांत धरणसाखळीत ०.५९ टीएमसी पाणीसाठ्याची वाढ झाली आहे. सोमवारी (दि. २७) हा साठा २६.२६ टीएमसी होता. पाण्याची आवक कमी झाल्याने काल रात्रीपासून टप्प्याटप्प्याने विसर्ग कमी करून दुपारी पूर्णपणे बंद करण्यात आला होता.

मात्र, सायंकाळी पानशेत, वरसगाव आणि मुठा खोऱ्यात रिमझिम वाढल्याने धरणांमध्ये पुन्हा पाण्याची आवक वाढू लागली. खडकवासला धरणातून मुठा कालव्यात १,०५४ क्युसेक, तर बंदिस्त जलवाहिनीतून ६८५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पानशेतसह धरणक्षेत्रातून येणाऱ्या पाण्यामुळे खडकवासला धरणाची पातळी १०० टक्क्यांवर कायम ठेवण्यात येत आहे. मंगळवारी दिवसभरात टेमघर येथे १० मि.मी., पानशेत येथे १२ मि.मी., वरसगाव येथे १३ मि.मी. आणि खडकवासला येथे २ मि.मी. पावसाची नोंद झाली.

वरसगाव चार ते पाच दिवसांत ‘ओव्हरफ्लो‘

खडकवासला धरणसाखळीची एकूण पाणी साठवण क्षमता २९.१५ टीएमसी आहे. त्यामध्ये वरसगाव धरणाची क्षमता सर्वाधिक १२.८२ टीएमसी असून, पानशेतची १०.६५ टीएमसी, टेमघरची ३.७१ टीएमसी आणि खडक वासल्याची १.९७ टीएमसी आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरले असून, पानशेत धरणही पूर्ण क्षमतेच्या उंबरठ्यावर आहे. वरसगाव धरणात ९० टक्क्यांहून अधिक साठा झाल्याने येत्या चार ते पाच दिवसांत तेही पूर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाज शाखा अभियंताप्रतीक्षा रावण मारके यांनी व्यक्त केला.

मंगळवारचा पाणीसाठा

धरण टीएमसी टक्केवारी

  • खडकवासला १.९७ १००

  • पानशेत १०.३७ ९७.३५

  • वरसगाव ११.६१ ९०.५७

  • टेमघर २.९० ७८.१७

नाझरे धरणात ८१ टक्के पाणीसाठा

सदैव दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या पुरंदर तालुक्यासाठी जीवनदायिनी ठरलेल्या नाझरे धरणात सध्या ८१ टक्के पाणीसाठा झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत धरणाच्या पाणलोटक्षेत्रात केवळ ३०३ मिमी पावसाची नोंद झाली असून, अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

नाझरे धरणाची पाणीसाठवण क्षमता पाऊण टीएमसी असून, त्यातील मृतसाठा २०० दशलक्ष घनफूट आहे. पुरंदर तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९६ मिमी असल्याने या भागात नेहमीच दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. मागील वर्षी सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्याने जुलै महिन्यातच धरण पूर्णक्षमतेने भरले होते. त्यामुळे वर्षभर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नव्हती. यंदा मात्र जून-जुलै या दोन महिन्यांत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरणात ८१ टक्के साठा झाला असला, तरी समाधानकारक पावसाची गरज कायम आहे.

नाझरे धरणावर पुरंदर आणि बारामती तालुक्यातील ४० हून अधिक गावे तसेच जेजुरी औद्योगिक वसाहतीचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अवलंबून आहे. याशिवाय सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्राला हंगामी सिंचनासाठी या धरणातून पाणी दिले जाते. पावसाळ्याचे आणखी दोन महिने आणि परतीच्या मान्सूनकडून चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धरण पूर्णक्षमतेने भरल्यास पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचीही चिंता दूर होणार आहे. सध्या समाधानकारक पाऊस नसला, तरी परिसरात खरिपाच्या पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT