Engineer Pudhari
पुणे

Khadakwasla Canal Encroachment: खडकवासला कालव्यातील अतिक्रमण हटवण्यासाठी 50 उपअभियंते तैनात

पुण्यात खडकवासला ते फुरसुंगी कालव्यातील अतिक्रमण हटवण्यासाठी जलसंपदा विभागाची मोहीम वेगात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: खडकवासला धरणाच्या परिसराबरोबरच फुरसुंगीपर्यंतच्या मुठा उजवा कालव्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी जलसंपदा विभागाने आता अतिरिक्त 50 उपअभियंते तैनात केले आहेत. कालव्याच्या प्रत्येक पाच किलोमीटरसाठी चार अभियंते या मोहिमेत नेमण्यात आले आहेत. तसेच, कालव्याच्या परिसरातील झोपडपट्‌्‌‍ट्यांची अतिक्रमणे काढल्यानंतर या ठिकाणी सीमाभिंत उभारण्यात येईल, अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

दरम्यान, धरण परिसरातील 100 अतिक्रमणे काढण्यात आली असून, कालव्यावरील 25 हेक्टरपैकी पाच हेक्टर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. खडकवासला धरण परिसरात वाढत्या अतिक्रमणांबाबत तक्रारी आल्यानंतर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. ही अतिक्रमणे तातडीने काढावीत, असे आदेश त्यांनी जलसंपदा विभागाला दिले होते. गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमण हटावची मोहीम सुरू आहे.

विखे पाटील यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी खडकवासला धरणातील अतिक्रमणांबाबत विचारले असता त्यांनी अतिक्रमणे काढून ही जमीन ताब्यात घेणार असल्याचे स्पष्ट केले. खडकवासला धरणातून फुरसुंगीपर्यंत असलेला कालवा शहरातून जात असल्याने या ठिकाणी अतिक्रमणांची संख्या जास्त आहे. त्यात झोपडपट्‌‍ट्यांची संख्या जास्त असल्याने ते काढणे आव्हानात्मक असल्याचे त्यांनी कबूल केले.

मात्र, या सर्व झोपडपट्‌‍ट्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, ही सर्व अतिक्रमणे काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी जलसंपदा विभागातील 50 उपअभियंत्यांना या मोहिमेत सामील करून घेण्यात आले आहे. अतिक्रमणे काढण्यासाठी प्रत्येक पाच किलोमीटरमागे चार उपअभियंते या मोहिमेत सहभागी असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. अतिक्रमणे काढल्यानंतर या ठिकाणी सीमाभिंत उभारण्यात येईल, असेही ते या वेळी म्हणाले. जलसंपदा विभागाने अतिक्रमणे काढण्यासाठी ड्रोन सर्व्हे करण्यात आला. अतिक्रमणांमध्ये रिसॉर्ट हॉटेल तसेच घरांचाही समावेश असल्याचे या ड्रोन सर्व्हेमधून स्पष्ट झाले होते.

गेल्या काही महिन्यांपासून ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून, आतापर्यंत धरण परिसरातील 90 टक्के अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. तर, कालव्याच्या परिसरात असलेल्या झोपडपट्‌‍ट्यांची अतिक्रमणे सुुमारे 25 हेक्टरवर आहेत. यापैकी पाच हेक्टर क्षेत्र अतिक्रमणमुक्त केल्याची माहिती अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT