Ketan Agarwal Murder Case Pudhari
पुणे

Ketan Agarwal Murder Case: केतन अगरवाल खूनप्रकरणात धक्कादायक खुलासे; सिया-चेतनच्या कटाचा तपास अधिक गडद

लोहगडवरील हत्येचे ‘क्राइम रिक्रिएशन’ होणार; सियाच्या भावाची चौकशी, तपासात नवे धागेदोरे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केतन अगरवाल खून प्रकरणात त्याची भावी पत्नी सिया गोयल हिनेच हा कट रचल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. यामध्ये तिचा प्रियकर चेतन चौधरीने तिला साथ दिली. त्यामुळे पोलिस दोघांकडेही कसून तपास करत आहेत. दरम्यान, सिया कठोर असून, चेतन मात्र पोलिसांसमोर रडला असल्याची माहिती आहे. दोघे सध्या लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आहेत. १८ जून रोजी सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनला लोहगड किल्ल्यावरून ढकलून दिले. सुरुवातीला सियाने अपघाताचा बनाव रचला. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासामुळे खुनाचा प्रकार समोर आला.

सियाला केतनसोबतचे लग्न मान्य नव्हते. त्याला आपल्या वाटेतून कायमचे दूर करायचे होते. त्यासाठी प्रियकर चेतन चौधरीसोबत मिळून तिने केतनच्या खुनाचा कट रचला. केतनच्या खुनाच्या एक दिवस अगोदर १७ जून रोजी ती आणि तिचा प्रियकर चेतन हे दोघे लुल्लानगर येथील थर्ड वेव्ह कॅफेत भेटले. त्याच ठिकाणी सियाने केतनला कसे संपवायचे याची योजना चेतनला सांगितली असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे सियाच्या चेहऱ्यावर केतनच्या खुनाचा पश्र्चाताप दिसून येत नाही. ती अतिशय कठोर आहे, तर चेतन चौधरी मात्र पोलिसांसमोर रडल्याची माहिती आहे. दिवसेंदिवस दोघांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

सियाचा भाऊ साहिल गोयलची पाच तास चौकशी

केतनच्या खुनाच्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याला शुक्रवारी (दि.२६) सकाळी चौकशीसाठी बोलावले होते. त्याची पाच ते सहा तास कसून चौकशी केली आहे. लग्न ठरल्यापासून सिया आणि केतन या दोघांचे नाते कसे होते? त्यांच्यात कोणत्या कारणातून वाद होते का? सियाला केतनसोबत लग्न का करायचे नव्हते? तसेच चेतन चौधरी आणि सिया या दोघांच्या प्रेमसंबंधाच्या अनुषंगाने देखील पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्याचे समजते. सिया आणि केतन हे दोघे जेव्हा प्रीवेडिंग शुटसाठी बाली, इंडोनेशिया येथे निघाले होते. तेव्हा साहिल देखील त्यांच्यासोबत निघाला होता. परंतु मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर केतनचा पासपोर्ट मिळून आला नाही. त्यामुळे त्यांना परत पुण्याकडे यावे लागले. सियाने केतनचा पासपोर्ट चोरी करून फाडून फेकून दिला होता. साहिल हा त्यांच्यासोबत होता. त्यामुळे साहिलच्या चौकशीतून पोलिसांना महत्त्वाचे काही धागेदोरे मिळाले असल्याचा अंदाज आहे. त्याचा जबाब नोंदवून त्याला सोडून देण्यात आले.

आतापर्यंत १० जणांचे नोंदवले जबाब

लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून देऊन हत्या झालेल्या केतन अग्रवालप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आज मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या भावाला ताब्यात घेत त्याचा जबाब नोंदविला आहे. सकाळपासून हा जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. याबाबत बोलताना लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे म्हणाले, आतापर्यंत ८ ते १० जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. या घटनेतील आरोपी असलेले सिया गोयल व चेतन चौधरी यांच्यासह जबाब नोंदविलेले सर्वजण तपास कामात सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. पोलिस निरीक्षक तायडे म्हणाले, दोन्ही आरोपींनी यापूर्वीच गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू आहे. जबाब नोंदविताना जी नावे समोर येत आहेत, त्यांची चौकशी करून त्यांचे जबाब घेतले जात आहेत.

केतनचे टक्कल, तोतरेपणा सियाला खटकत होता

केतन अगरवाल खून प्रकरणात दररोज नवे नवे खुलासे समोर येत आहेत. आरोपी सिया गोयल हिला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. केतनच्या डोक्यावर कमी केस होते आणि तो केसांचा विग वापरत असल्याची बाब तिला खटकत होती. तसेच केतन तोतरे बोलत असल्यानेही ती नाराज होती. याच कारणांमुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे समजते.

त्यातूनच सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी कट रचून केतनचा लोहगड किल्ल्यावरून ढकलून देऊन १८ जून रोजी खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. सध्या दोन्ही आरोपी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या कोठडीत असून त्यांच्याकडे सुरू असलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, केतन तोतरे बोलत होता. लग्न ठरवताना सियाच्या कुटुंबीयांना या बाबींची माहिती होती. मात्र, त्यांनी त्याकडे सामान्य बाब म्हणून पाहिले होते. परंतु सियाला केतनचा विग वापरणे आणि त्याचा तोतरेपणा मान्य नव्हता. चौकशीत पोलिसांनी सियाला विचारले की, तुला केतनशी लग्न करायचे नव्हते, तर तू ही बाब कुटुंबीयांना का सांगितली नाहीस? त्यावर सियाने घरच्यांच्या भावना दुखावू इच्छित नसल्याचे सांगितले. मात्र, त्याऐवजी केतनचा खून करण्याचा मार्ग तिला अधिक सोपा वाटल्याचे तिने कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सियाची योजना अशी होती की, केतनचा खून करून तो ट्रेकिंगदरम्यान दरीत पडल्याचा बनाव करायचा. त्यामुळे त्याचा मृत्यू होईल आणि त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने कोणालाही संशय येणार नाही. केतनचा मृत्यू हा अपघात असल्याचेच सर्वांना वाटेल, असा तिचा समज होता. दरम्यान, याबाबत बोलताना केतनचे वडील विशाल अगरवाल म्हणाले, 'केतन केसांचा विग वापरत असल्याची माहिती आम्ही सियाच्या कुटुंबीयांना आधीच दिली होती. एखाद्याचा खून करण्यासाठी हे काही कारण असू शकते का?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

केतनच्या खुनाचे होणार ‘क्राइम रिक्रिएशन’

लुल्लानगरमधील एका कॅफेत कॉफीचे घोट घेत घेत रचलेला खुनाचा कट... त्यानंतर लोहगडाच्या दरीत ढकलून दिल्‍यानंतर झालेला केतन अगरवालचा मृत्यू... आणि आता या संपूर्ण घटनाक्रमाची सत्यता पडताळण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस आरोपींना घटनास्थळी नेऊन दोन दिवसांत 'क्राइम रिक्रिएशन' करणार आहेत. या प्रक्रियेत आरोपींकडून संपूर्ण घटनाक्रम पुन्हा करून घेत पोलिस प्रत्येक हालचालींची पडताळणी करणार आहेत. तपासानुसार, केतन अगरवाल हा सिया गोयलसोबत लग्नाची स्वप्ने पाहत होता. मात्र, सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी त्याला मार्गातून दूर करण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा कट लोहगडावर नव्हे, तर कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथील एका कॅफेत अनेक बैठक घेऊन आखण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतनला कुठे न्यायचे, कोणत्या ठिकाणी नेऊन त्‍याचा घात करायचा, संशय कसा टाळायचा, अपघाताचा आभास कसा निर्माण करायचा, याचे कथित नियोजन आरोपींनी आधीच केले होते. त्यानंतर केतनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. खुनाच्या दिवशी संशय येऊ नये म्हणून चेतन चौधरीने स्वतःचा मोबाईलही घरी ठेवल्याचे यापूर्वीच तपासात समोर आले आहे. दि. १८ जून रोजी सिया केतनला लोहगडावर घेऊन गेली. चेतन आधीपासूनच किल्ल्यावर उपस्थित होता. ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सियाने खाली बसून संकेत दिला आणि त्यानंतर चेतनने मागून येत केतनला दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यानंतर केतनचा तोल जाऊन पडल्याची कथा सांगत अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न झाल्याचाही तपासात दावा केला आहे. या संपूर्ण प्रकरणात केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी सुरुवातीपासून व्यक्त केलेल्या संशयामुळे तपासाला वेगळी दिशा मिळाली. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, डिजिटल पुरावे, आरोपींची चौकशी आणि इतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम उलगडल्याचा दावा केला आहे.

क्राइम रिक्रिएशन म्हणजे काय?

गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपींना घटनास्थळी नेऊन त्यांनी गुन्हा नेमका कसा केला, कोणत्या मार्गाने आले, कुठे उभे राहिले, कोणत्या क्षणी काय घडले आणि घटनाक्रम प्रत्यक्षात शक्य होता का, याची पडताळणी करण्याच्या प्रक्रियेला 'क्राइम रिक्रिएशन' म्हटले जाते. या प्रक्रियेत पोलिस घटनास्थळावरील प्रत्येक हालचाल, वेळ, अंतर, आरोपींची भूमिका आणि साक्षी- पुराव्यांशी त्याची सांगड घालतात. रिक्रिएशनदरम्यान मिळालेली माहिती तपासाला दिशा देण्यासाठी आणि न्यायालयात सादर करण्यात येणाऱ्या परिस्थितीजन्य पुराव्यांची सुसंगती तपासण्यासाठी महत्त्वाची ठरते. मात्र, हे स्वतःमध्ये स्वतंत्र पुरावा नसून, तपास अधिक भक्कम करण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते.

‘माझी मुलगी दोषी ठरली तर तिला फाशीची शिक्षा द्या’

केतन अगरवाल याच्या खुनानंतर सिया हिचे आई-वडील प्रचंड धक्क्यात आहेत. सियाचे वडील प्रवीण गोयल यांची तब्‍येत बिघडल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालता उपचार सुरू आहेत. गोयल यांनी सांगितले की, केतनच्या खुनास जबाबदार असलेल्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, मग ती त्यांची मुलगी सिया असली तरीही.

सियाची आई पूजा गोयल यांनीही सांगितले की, जर त्यांच्या मुलीने कोणताही गुन्हा केला असेल, तर तिला कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी केतन याचे वर्णन सुसंस्कृत, समंजस आणि सर्वांशी प्रेमाने वागणारा व्यक्ती असे केले. "केतन आमचा जावई झाला असता, तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजलो असतो. पण आता तो आपल्यात नाही, याचे आम्हाला खूप दुःख आहे," असे त्या म्हणाल्या.

मी पूर्ण शुद्धीत बोलत आहे; दोषी असेल तर फाशी द्या'

रुग्णालयातून बोलताना प्रवीण गोयल भावूक म्हणाले, केतन हा फक्त माझा होणारा जावई नव्हता, तर तो माझ्यासाठी मुलासारखाच होता. ज्याने त्याचा खून केला आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. तपासात माझी मुलगी सिया दोषी आढळली, तर तिलाही फाशीची शिक्षा व्हावी. मी हे पूर्ण शुद्धीत आणि विचारपूर्वक सांगत आहे. या वेळी त्यांनी सांगितले की, सिया आणि चेतन चौधरी या दोघांच्या प्रेमसंबंधाबद्दल आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. कधी सिया हिने त्याचा उल्लेख देखील केला नाही. आम्ही तिला केतन याच्यासोबतच्या लग्नाबाबत विचारले असता, तिने आपण लग्नास तयार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे वेगळा संशय येण्याचे कारण नाही.

'केतन आमच्यासाठी मुलासारखाच होता'

सियाची आई पूजा गोयल यांनीही प्रथमच मौन सोडले. त्या म्हणाल्या, केतन अत्यंत सुसंस्कृत, समंजस आणि मनमिळावू होता. तो आम्हाला आई-वडिलांप्रमाणे मानायचा. माझा मुलगा साहिलपेक्षाही तो मला अधिक मान देत असे. त्याने संपूर्ण कुटुंबावर भरभरून प्रेम केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT