Ketan Agarwal Case Pudhari
पुणे

Ketan Agarwal Case: केतनला बंगळुरूला नेऊन.... ; पण मित्राच्या 'वेडे आहात का' रिप्लायमुळे प्लान बदलला... नवी माहिती समोर

पासपोर्ट फाडणे, ‘माही’ नावाने फेक सोशल मीडिया अकाउंट तयार करण्याचाही विचार; डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब दोषारोपपत्रात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केतन अगरवाल याचा खून करण्यापूर्वी त्याला बंगळुरूला नेऊन त्याचे हात-पाय तोडण्याचा विचार सिया-चेतन या दोघांनी केला होता. तसेच, केतनचा पासपोर्ट फाडणे आणि त्याच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करणे, या कल्पनाही चेतन चौधरी याने मांडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या सर्व बाबतीत रितेश हंगे हा सल्लागाराची भूमिका बजावत असल्याचे देखील पोलिस तपासातून समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे केतनसोबत विवाह करण्याची इच्छा नसल्याचे सिया गोयल हिने अनेक व्यक्तींकडे बोलून दाखविले होते.

या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात तब्बल ५ हजार ३०० पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात प्रत्यक्षदर्शींसह विविध व्यक्तींचे जबाब, छायाचित्रे, सोशल मीडिया खात्यांची माहिती तसेच अन्य डिजिटल पुरावे जोडण्यात आले आहेत. केतनला बंगळुरूला नेऊन त्याचे हात-पाय तोडण्याचा विचार करण्यात आला होता. यासंदर्भात रितेश हंगे याने बंगळुरूमधील एका मित्राशी चर्चा केली होती.

मात्र, संबंधित मित्राने या प्रकाराला विरोध केला. 'तुम्ही वेडे आहात का? असे काही करू नका,' असा सल्ला त्याने दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या व्यक्तीचा जबाब पोलिसांनी नोंदविला असून, तो दोषारोपपत्राचा भाग आहे. केतनसोबत विवाह करण्याची इच्छा नसल्याचे सियाने अनेक व्यक्तींकडे बोलून दाखविले होते. तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविले आहेत. त्यामुळे केतनसोबतच्या विवाहाबाबत सियाची भूमिका काय होती, याची माहितीही दोषारोपपत्रातून पुढे आली आहे.

डिजिटल पुरावे पोलिसांनी केले संकलित

केतनपासून सुटका करण्यासाठी त्याचा पासपोर्ट फाडणे, तसेच सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करणे, या कल्पना चेतन चौधरी याने मांडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चेतनने 'माही' या नावाने इन्स्टाग्राम अकाउंट तयार केल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले असून, या अकाउंटशी संबंधित डिजिटल पुरावे पोलिसांनी संकलित केले आहेत.

केतनविरुद्ध करण्यात आलेल्या कटाच्या विविध टप्प्यांमध्ये रितेश हंगे याची भूमिका महत्त्वाची असल्याचे तपासात समोर आले आहे. बंगळुरूला नेण्यापासून अन्य पर्यायांबाबतही रितेशकडून सल्ला घेतला जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यासंदर्भातील जबाब आणि डिजिटल पुरावे दोषारोपपत्रात जोडण्यात आले आहेत.

उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील

केतन अगरवाल खूनप्रकरणाच्या न्यायालयीन कामकाजासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून लवकरच नियुक्ती केली जाणार आहे. या सगळ्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT