Revenue Pudhari
पुणे

Kesnand Fake Revenue Order Case: केसनंद बनावट महसूल आदेश प्रकरण; चौकशीत मोठे गौप्यस्फोट होण्याची चर्चा

महसुली कागदपत्रांतील फेरफार, दलालशाही आणि राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

लोणी काळभोर: केसनंद बनावट महसूल आदेश प्रकरणात सखोल चौकशी होऊन गुन्हे दाखल झाल्यास अनेक धक्कादायक नावे आणि बाबी समोर येऊ शकतात, अशी चर्चा प्रशासन व राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या प्रकरणावर राजकीय दबाव टाकून पडदा टाकण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बनावट आदेश, महसुली कागदपत्रांमधील फेरफार आणि दलालशाहीच्या साखळ्यांचा छडा लावला गेला, तर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गैरप्रकारांचे जाळे उघड होऊ शकते. पूर्व हवेलीतील वाढता राजकीय हस्तक्षेप, महसूल अधिकाऱ्यांवरील दबाव आणि दलालशाहीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणात महसूलमंत्र्यांनी या भागात विशेष लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे.

सध्यातरी पूर्व हवेलीत एकच चर्चा ऐकायला मिळत आहे. 'जनता वाऱ्यावर, दलाल मात्र सत्तेच्या छत्राखाली!' प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी वेळेत हस्तक्षेप केला नाही, तर अशा प्रकरणांची मालिका भविष्यात आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

केसनंद येथे महसूल विभागाचे कथित बनावट आदेश तयार झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महसूल प्रशासनातील अनेक गंभीर बाबी चर्चेत आल्या आहेत. बनावट आदेशांच्या माध्यमातून प्रशासकीय निर्णयांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाला का? याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, काही राजकीय पंटर आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी प्रशासकीय यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करून वातावरण दूषित केले आहे.

अनेक निर्णयांमागे सामान्य नागरिकांचा नव्हे, तर विशिष्ट दलाल आणि हितसंबंधी गटांचा प्रभाव असल्याचा आरोप होत आहे. पूर्व हवेलीत सध्या अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे की, अधिकृत पदांवर असलेल्या व्यक्तींपेक्षा त्यांच्याभोवती फिरणारे तथाकथित राजकीय पंटर आणि दलाल अधिक प्रभावशाली बनले आहेत. त्यामुळे महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर अनावश्यक दबाव निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT