Road Widening Pudhari
पुणे

Keshavnagar Road Widening: केशवनगरमधील दोन प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण रखडले; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

छत्रपती शिवाजी महाराज चौक-मांजरी व रेणुकामाता मंदिर रस्त्यांचा प्रश्न; नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्याचे पालिकेचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

नितीन वाबळे

मुंढवा: केशवनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मांजरी आणि रेणुकामाता मंदिर या दोन प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे. यातील पहिला रस्ता १८ मीटर, तर दुसरा रस्ता २४ मीटर रुंदीचा करण्याचे पालिकेचे नियोजन असतानाही प्रत्यक्षात हे रस्ते काही ठिकाणी केवळ आठ मीटर, तर काही ठिकाणी दहा ते बारा मीटर इतकेच रुंद आहेत. त्यामुळे वाढत्या वाहतुकीचा मोठा ताण या दोन्ही रस्त्यांवर येत असून, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या दोन्ही रस्त्यांचे तत्काळ रुंदीकरण करावे, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी महापालिकेने या दोन्ही रस्त्याच्या बाजूंना अतिक्रमण कारवाई करून कडेला असलेली काही अतिक्रमणे हटविली होती. त्यामुळे काही प्रमाणात रस्ता मोकळा झाला असला, तरी अद्याप अनेक ठिकाणी अतिक्रमणे कायम आहेत. रस्त्याच्या कडेला वाहतुकीस अडथळा ठरणारी काही झाडेही आहेत. ही झाडे हटविल्यास रस्ता आणखी मोकळा होऊन वाहतुकीला दिलासा मिळू शकतो. मात्र, याबाबत पालिका प्रशासनाकडून कार्यवाही झालेली नाही.

मनपाच्या विविध विभागांच्या समन्वयातून रस्तारुंदीकरणासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२६ पर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. रस्त्याचे नियोजित रुंदीकरण लवकरात लवकर पूर्ण करून आवश्यक जागा ताब्यात घेणे, उर्वरित अतिक्रमणे हटविणे, तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबींवर तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेणुकामाता मंदिराकडे जाणारा २४ मीटर रस्ता पालिकेच्या ताब्यात आहे. या रस्त्यावर पालिकेला कुठेही ताबा घेण्याची गरज नाही. त्या रस्त्याचे काम पालिकेने अगोदर मार्गी लावावे. मांजरी रस्ता १८ मीटर आहे हा रस्ता ताब्यात घेताना संबंधित जागामालकांना अगोदर त्याचा मोबदला द्यावा व मगच रस्ता करावा.
दत्तात्रय कोद्रे, स्थानिक नागरिक, केशवनगर
केशवनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मांजरी रस्ता व रेणुकामाता मंदिर रस्ता या दोन्ही रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, तसेच जागा ताब्यात घेणे ही कार्यवाही महापालिकेकडून सुरू आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत ही कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.
प्रवीण जगताप, कनिष्ठ अभियंता, पथ विभाग, मनपा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT