

पुणे: मातीचा सुवास, चिमुकल्या हातांची जादू आणि मनामध्ये बाप्पाच्या आगमनाची ओढ... याच उत्साही वातावरणात हसतखेळत कोथरूड येथील मा. वि. प्र. म. संचालित महेश विद्यालयात बालशिल्पकारांनी अत्यंत रेखीव आणि कल्पक गणेशमूर्ती साकारल्या.
निमित्त होते 'पुढारी' माध्यम समूह, पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'माझा बाप्पा २०२६' या विशेष उपक्रमाचे! या कार्यशाळेच्या माध्यमातून महेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती घडवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा दृढ संकल्प केला. महेश विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत झंवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमासाठी सॉलिटर ग्रुप, गोयल गंगा ग्रुप, बढेकर ग्रुप, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ पुणे, ऑटोट्रॉनिक्स इंजिनिअरिंग प्रा. लि. आणि केले. ग्रुप यांनी सहप्रायोजक म्हणून मोलाचे सहकार्य लाभले. मूर्ती घडवण्यासोबतच तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना जलप्रदूषण, निसर्गाची हानी आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन, याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. यंदाच्या उत्सवात मुलांनी स्वतः तयार केलेल्या या शाडू मातीच्या मूर्तींचीच पालकांनी घरी प्राणप्रतिष्ठा करावी, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन अन् कलेला मिळालेला वाव...
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दिशा
देण्यासाठी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या शिल्पकला विभागाचे मार्गदर्शक पुढे आले. कीर्ती मुळे, जिज्ञासा कुंभार, शिवानी वर्मा, तेजस राठोड, सतीश कीर्तिकर आणि राकेश चव्हाण यांनी चिमुकल्यांना अतिशय सोप्या व रंजक पद्धतीने मातीपासून मूर्ती घडवण्याचे तंत्र शिकवले. मातीच्या गोळ्याला आकार देत बालशिल्पकारांनी जेव्हा बाप्पाचे रूप साकारले, तेव्हा महेश विद्यालयात गणेशभक्ती, कला आणि पर्यावरण संवर्धनाचा तिहेरी संगम पाहायला मिळाला.
दोन सत्रांत रंगला मूर्तिकलेचा आनंदोत्सव
महेश विद्यालयात पार पडलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रात इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी तर दुपारच्या सत्रात सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. स्वतःच्या हाताने साकारलेली ही विघ्नहर्त्याची मूर्ती घरी नेऊन तिचीच प्राणप्रतिष्ठा करायची, या विचाराने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि अभिमान ओसंडून वाहत होता. या प्रसंगी शाळेच्या प्रिन्सिपल अश्विनी मुजुमदार यांच्यासह इंग्रजी व मराठी माध्यमातील शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
पारंपरिक गणेशोत्सव सण साजरा करीत असताना परंपरा, संस्कृतीची विद्यार्थ्यांना माहिती मिळण्यासोबतच त्यांच्यामध्ये पर्यावरणाबाबतची जनजागृती दैनिक ‘पुढारी’ माध्यम समूहाच्या या उपक्रमातून मिळत आहे. विद्यार्थ्यांना इको-फ्रेंडली गणपती काय असतो, त्याबाबतची माहिती या उपक्रमातून मिळाली, त्यांच्यावर पर्याावरण रक्षणाबाबतचे झालेले हेच संस्कार ते पुढच्या पिढीला नक्कीच देतील. या उपक्रमामुळे पुढच्या अनेक पिढ्या घडत राहतील, त्यासाठी आमची शाळा एक पर्यावरण जनजाग़ृतीचे माध्यम ठरली, याचा आम्हाला अभिमान आहे.
अश्विनी मुजुमदार, प्रिन्सिपल, महेश विद्यालय (इंग्रजी माध्यम)
पुढारी माध्यम समूह आणि महेश विद्यालय सेमी इंग्रजी माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली गणपती कार्यशाळा हा अत्यंत उपक्रमशील आणि कौतुकास्पद सोहळा ठरला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि हस्तकौशल्याला उत्तम वाव मिळाला. मुलांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांची एकाग्रता वाढवण्यास ही कार्यशाळा उपयुक्त ठरली. कलाकुसरीसोबतच विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दृष्टिकोन, स्वच्छता आणि जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. भारतीय संस्कृतीचे जतन आणि पर्यावरण संवर्धन करण्यासाठी असे उपक्रम मोलाचे ठरतात. शाळा समितीचे अध्यक्ष प्रशांत झेवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यशाळांचे आयोजन केल्याबद्दल पुढारी माध्यम समूहाचे मनःपूर्वक आभार...!
जान्हवी अजोतीकर, मुख्याध्यापिका, महेश विद्यालय (सेमी इंग्रजी माध्यम)