केशवनगर येथील अरकॉन सिल्वर लिप या सोसायटीच्या गेटशेजारील सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेला बिबट्या. Pudhari
पुणे

Leopard Spotted: केशवनगरमध्ये बिबट्याचा वावर; दोन सोसायट्यांच्या सीसीटीव्हीत कैद

नदीपात्राच्या दिशेने गेल्याचा अंदाज, वन विभागाचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

मुंढवा : केशवनगरमधील कोणार्क रिवा व अरकॉन सिल्वर लीप या दोन सोसायट्यांच्या सीसीटीव्हीमध्ये गुरुवारी (दि.18) पहाटे बिबट्या दिसून आला. याची माहिती मिळताच हवेली वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी केशवनगरमध्ये दाखल झाले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेऊनही बिबट्या आढळून आला नाही.

आजूबाजूच्या सोसायट्यांचे सीसीटीव्ही तपासले असता केशवनगरमधील नदीपात्राकडील बाजूस बिबट्या गेला असल्याचे आढळून आले आहे. प्रशासनाने केशवनगरमधील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून, बिबट्या दिसताच ११२ या पोलिस हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

येथील रेणुकामाता मंदिराजवळील कोणार्क रिवा सोसायटीच्या गेटशेजारी गुरुवारी पहाटे सव्वादोन वाजता तर या सोसायटीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या अरकॉन सिल्वर लिप या सोसायटीच्या आवारात पहाटे सव्वाचार वाजता बिबट्या जात असल्याचे सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. या सोसायटीच्या वॉचमननेही बिबट्या येथून जात असल्याचे पाहिले आहे. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सकाळी या ठिकाणी आले व शोधाशोध केली असता या सोसायट्यांच्या आवारात बिबट्याचे ठसे दिसून आले. पोलिस व वन विभागाच्या अधिकार्‍यांनी आजूबाजूच्या सोसायट्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता केशवनगर येथील नदीपात्राच्या बाजूला बिबट्या गेला असल्याचे आढळून आले.

येथील स्थानिक नागरिक जितीन कांबळे, गणेश बधे, श्रीकांत सूर्यवंशी, प्रवीण प्रधान, सुधीर श्रीवास्तव, बाबा कोरे, मोहन भालेराव, अनिकेत गागडे, अनिल भांडवलकर, दिलीप भंडारी यांनी बिबट्याला शोधण्यासाठी वन विभागाच्या अधिकार्‍यांना सहकार्य केले.

केशवनगरमध्ये तिसर्‍यांदा बिबट्या-

फेब्रुवारी २०१९ मध्ये केशवनगर येथील म्हसोबावस्तीतील व्हर्टिकल इन्फ्रास्ट्रक्चर या सोसायटीच्या आवारात शिरलेल्या बिबट्याला प्रशासनाने जेरबंद केले होते. मागील सहा महिन्‍यांपूर्वीही केशवनगर परिसरात बिबट्या दिसला असल्याचे नागरिक सांगतात. गुरुवारी पहाटे केशवनगर येथील दोन सोसायट्यांच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या दिसून आला आहे.

नागरिकांनी सतर्क राहावे-

केशवनगरमधील सोसायट्यांच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या दिसून आला. मात्र, दिवसभर शोध घेऊनही बिबट्या कुठे आढळून आला नाही. वन विभागाच्या अधिका-यांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले असता येथील नदीपात्राच्या बाजूला बिबट्या गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी सतर्कता बाळगावी व बिबट्या कुठे दिसून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

केशवनगर आणि परिसरात आम्ही बिबट्याचा शोध घेत आहोत. येथील नदीपात्राकडील बाजूला बिबट्या गेल्याचे सीसीटीव्ही पाहणीत आढळले आहे. आम्ही रात्रीही बिबट्याचा शोध सुरू ठेवणार आहे.
सुरेश वरक, वनपरिक्षेत्र अधिकारी, हवेली विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT