Fetal Determination Pudhari
पुणे

Pune Illegal Fetal Determination: केडगाव-बोरीपार्धी परिसरात गर्भलिंग निदान टोळी गायब; कोट्यवधींच्या रॅकेटवर संशय

सात वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप; आरोग्य विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

केडगाव: दौंड तालुक्यातील केडगाव-बोरीपार्धी परिसरात गेल्या काही वर्षांपासून सक्रिय असलेली गर्भलिंगनिदान करणारी टोळी अचानक गायब झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या सात ते आठ वर्षांच्या कालावधीत बेकायदा गर्भलिंग निदान चाचण्यांच्या माध्यमातून या टोळीने कोट्यवधी रुपयांची माया जमा केल्याची जोरदार चर्चा आहे.

परिसरातील नागरिकांमध्ये सध्या या प्रकरणावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. या टोळीला आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांचा वरदहस्त होता का? अथवा जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात आली? असा गंभीर सवाल उपस्थित केला जात आहे. हजारो गर्भलिंगनिदान चाचण्या या टोळीमार्फत करण्यात आल्या. मात्र, एवढा बेकायदा प्रकार सुरू असताना संबंधित यंत्रणांना याची माहिती नव्हती का? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, गर्भलिंगनिदान चाचणीसाठी 30 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम आकारली जात असल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी मध्यस्थांच्या माध्यमातून ग््रााहक आणले जात होते, तर काही महिलांना रात्रीच्या वेळी गुप्तपणे वेगवेगळ्या ठिकाणी नेले जात असल्याच्याही चर्चा आहेत. एका दिवसात दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंत कमाई होत असल्याचे समजते. या पैशातून संबंधितांनी मोठ्या प्रमाणात मालमत्ता, वाहने आणि इतर गुंतवणूक केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

या बेकायदेशीर कामासाठी वापरण्यात आलेल्या सोनोग््रााफी मशिन्स नेमक्या कोणाच्या मालकीच्या होत्या? त्या कुठून खरेदी करण्यात आल्या? त्यांची अधिकृत नोंद आहे का? तसेच त्या मशिन्सचा वापर कोणत्या डॉक्टर किंवा तंत्रज्ञांकडून केला जात होता? याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. आरोग्य विभागाकडे संबंधित मशिन्सची माहिती आहे का? याचाही तपास होणे महत्त्वाचे मानले जात आहे.

गर्भलिंग निदान करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा मानला जातो. तरीदेखील अनेक वर्षे हा कथित व्यवसाय सुरू राहिल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, समाजात अजूनही मुलगा-मुलगी भेदभाव कायम असल्यामुळे अशा बेकायदेशीर टोळ्यांना खतपाणी मिळत असल्याची भावना सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी तसेच या रॅकेटशी संबंधित सर्व व्यक्तींना समोर आणावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT