पिंपरखेड: कवठे-टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाच्या राजकारणात ऐन निवडणुकीत एक मोठा आणि अनपेक्षित उलटफेर झाला आहे. राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाने (अजित पवार गट) शेवटच्या क्षणी इच्छुक उमेदवार राजेंद्र गावडे यांचा पत्ता कट करत, त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आणि शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक असलेले दामू अण्णा घोडे यांना थेट उमेदवारी निश्चित केली आहे. या निर्णयामुळे माजी आमदार पोपटराव गावडे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. संपूर्ण ‘बेट’ भागातील राजकारण ढवळून निघाले आहे. या अनपेक्षित खेळीमुळे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या बालेकिल्ल्याला मोठा सुरुंग लागला आहे.
पुण्यात रविवारी रात्री झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा अनपेक्षित निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, राजेंद्र गावडे यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली असतानाच त्यांची उमेदवारी कापण्यात आली. माजी आमदार पोपटराव गावडे आणि दामू घोडे यांच्यातील गेल्या चार-पाच वर्षांपासूनचे राजकीय वैर सर्वश्रुत असताना, पक्षाने थेट घोडेंच्या हाती “घड्याळ” दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. पक्षाने अचानक उमेदवारी कापल्याने गावडे समर्थकांना धक्का बसला आहे. 60 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पोपटराव गावडेंसाठी हा सर्वात मोठा पेच मानला जात आहे.
या गटात घडलेल्या नाट्यमय घडामोडीने मतदार संभमात पडले आहेत. जिल्हा परिषद गटात प्रचारात आघाडीवर असताना उमेदवारी नाकारली गेल्याने पोपटराव गावडे यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी असून, गावडेंना मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आता “घड्याळ” चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या दामू घोडेंचे काम करणार का? इतर उमेदवारांना पाठिंबा देणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बेट भागातील या जिल्हा परिषद गटात या अनपेक्षित राजकीय घडामोडींमुळे कवठे-टाकळी हाजी गटातील निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे.
गावडेंचे भाजपाप्रवेशाचे संकेत
या अनपेक्षित घडामोडीनंतर माजी आमदार पोपटराव गावडे यांनी जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली, त्यामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत मिळत आहेत. पोपटराव गावडे यांचे विश्वासू सहकारी आर. बी. गावडे यांनी बुधवारी भाजपचा झेंडा हातात घेऊनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जाणार असल्याचे सांगितल्याने गावडे गट भाजपमध्ये प्रवेश करणार, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. राजेंद्र गावडे यांनी सांगितले की, निवडणुका येतात जातात, पण शेवटपर्यंत मी जनतेसाठी लढत राहीन. पोपटराव गावडे यांनीही पक्षांतराचा निर्णय सर्वांच्या मताने घेतला जाईल, असे स्पष्ट केले. भाजप सत्तेत असून मुख्यमंत्री आपले मित्र असल्याचे वक्तव्य केल्याने त्यांच्या भाजपप्रवेशाची शक्यता अधिकच बळावली आहे.
राजेंद्र गावडे कसे लढणार
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबर सातत्याने ठाम भूमिका घेणारे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी पुढील दिशा ठरविण्यासाठी बेट भागातील सर्व कार्यकर्त्यांची यांची तातडीची बेठक बोलावून संवाद साधला असून, आता कोणती भूमिका घेणार आणि राजेंद्र गावडे अपक्ष शड्डू ठोकणार, की इतर पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौरंगी लढतीचे संकेत
या गटात आता डॉ. सुभाष पोकळे, राजेंद्र गावडे, दामू घोडे आणि बाळासाहेब डांगे हे प्रमुख चेहरे आमने-सामने येण्याची चिन्हे असल्याने लढत चौरंगी आणि अटीतटीची होण्याची शक्यता आहे.