

सासवड: पुरंदर तालुक्यातील गुन्हेगारीला हादरवून सोडणाऱ्या थरारक प्राणघातक हल्ल्याचा उलगडा अवघ्या 24 तासांत करण्यात सासवड पोलिसांना यश आले आहे. गुऱ्होळीतील हॉटेलसमोर भररस्त्यात दांडके, कोयता आणि गावठी पिस्तुलाचा वापर करत एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे.
गुऱ्होळी येथील हॉटेल महाराजा परमिट रूम अँड बीअर बारसमोर शुक्रवारी (दि. 16) रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास हा थरार घडला. येथे कृष्णा बाबासाहेब हवलदार (वय 26, रा. उरुळी कांचन) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या सहा ते सात जणांनी अचानक हल्ला केला. याचवेळी एका आरोपीने कोयत्याने त्यांच्या डोक्यावर वार केला, तर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या आरोपीने गावठी पिस्तुलातून एक गोळी हवेत झाडली, तर दुसरी गोळी थेट फिर्यादीच्या दिशेने झाडत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी कृष्णा हवलदार यांच्या फिर्यादीनुसार सासवड पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग््राामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग मिळाला. स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलिस ठाण्याच्या चार स्वतंत्र पथकांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या मदतीने आरोपींचा माग काढला.
या गुन्ह्यात विनित सोमनाथ कुंजीर, स्वराज खेडेकर, दीपक उर्फ भैया खेडेकर, सोहम गोरड, राहुल खेडेकर सर्व (रा. गुऱ्होळी, ता. पुरंदर), भावेश बाळासाहेब कुंजीर (रा. आंबळे, ता. पुरंदर), शुभम कुंभारकर (रा. वनपुरी, ता. पुरंदर), कुंकेश भिसे (रा. सासवड, ता. पुरंदर) या आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आली. त्यांपैकी मुख्य आरोपी अथर्व श्रीकांत जगताप (वय 19, रा. सुपे खुर्द, ता. पुरंदर) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यास 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, उर्वरित फरार आरोपींच्या शोधासाठी तीन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे करीत आहेत.