Katraj Dairy Pudhari
पुणे

Katraj Milk Dairy: कात्रज दूध संघातील कथित आर्थिक अनियमिततेचा मुद्दा विधान परिषदेत; योगेश टिळेकरांच्या मागणीने राजकीय चर्चा

चौकशीच्या मागणीवर मंत्र्यांचे आश्वासन; महायुतीतील स्थानिक राजकारणावर पुन्हा चर्चेला उधाण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महायुतीत सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील (कात्रज दूध) कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या संस्थेच्या कारभारावर भाजपच्या आमदारांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने महायुतीतील समन्वयावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

विधान परिषदेतील लक्षवेधी सूचनेदरम्यान आमदार टिळेकर यांनी पुणे दूध संघातील कथित आर्थिक अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर दुग्धविकासमंत्री अतुल सावे यांनी आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, या चर्चेनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुरू असलेल्या अंतर्गत राजकीय स्पर्धेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. विद्यमान अध्यक्षही राष्ट्रवादीचेच आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काळात या संस्थेच्या कारभारावर त्यांचे विशेष लक्ष होते. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही संस्थेच्या कारभारात लक्ष घातले आहे. नुकतीच झालेली अध्यक्षपदाची निवडही त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

या सर्व पार्श्वभूमीवर आमदार टिळेकर यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केल्याने त्यामागील राजकीय संदेश काय, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. टिळेकर यांचा मतदारसंघ महापालिका हद्दीतील असला तरी त्यांनी ग्रामीण भागातील सहकारक्षेत्राशी संबंधित या संस्थेतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा आक्रमकपणे मांडल्याने हा केवळ आर्थिक अनियमिततेचा प्रश्न नसून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महायुती सरकारमध्ये दोन्ही पक्ष एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर वर्चस्वासाठी सुरू असलेली स्पर्धा यापूर्वी समोर आलेली आहे. आता दूध संघाच्या मुद्द्यावरून भाजपने राष्ट्रवादीला थेट लक्ष्य केल्याने आगामी काळात या वादाला कोणते राजकीय वळण मिळते आणि राष्ट्रवादीकडून त्यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दूध संघावर भाजपची नजर?

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ही जिल्ह्यातील सहकारक्षेत्रातील प्रभावी संस्था मानली जाते. ग्रामीण भागातील राजकीय समीकरणांवर या संस्थेचा मोठा प्रभाव असल्याने तिचे नियंत्रण हे नेहमीच प्रतिष्ठेचे मानले जाते. सध्या संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असले तरी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच या संस्थेकडे राजकीय लक्ष केंद्रित केल्याची चर्चा आहे. विधान परिषदेत उपस्थित झालेला गैरव्यवहाराचा मुद्दा हा त्याच रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT