पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध संघाकडून गाय आणि म्हैस दूध खरेदीदरात प्रतिलिटर एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. दुधाची आवक कमी झाली असून, स्पर्धेत दूध खरेदीचे दर वाढू लागल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या निर्णयाची अंमलबजावणी दिनांक 1 डिसेंबरपासून सुरू झाली असून, संघाला दूधपुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे, तर दुधाच्या विक्रीदरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
गाय दूध खरेदीदरात प्रतिलिटर एक रुपयाने वाढ झाल्याने 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतीच्या दुधाचा दर आता लिटरला 35 वरून 36 रुपये, तर म्हैस दूध खरेदीदर 6.0 फॅट व 9.0 एसएनएफसाठी आता 51 रुपये 20 पैशांवरून 52 रुपये 20 पैसे करण्यात आल्याची माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी दिली. कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक 28 नोव्हेंबर रोजी संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्निल ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये दूध खरेदीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर दूध खरेदीदर वाढविण्यावर शिक्कामोर्तब करीत अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
ते म्हणाले, संघाकडे गायीच्या दुधाचे सध्या रोजचे संकलन सुमारे दोन लाख लिटरइतके होत आहे. तसेच म्हैस दुधाचे संकलन सुमारे 15 हजार लिटर इतके होते. सध्या दुधाचे उत्पादन कमी असल्याचा परिणाम म्हणून बाजारात सध्या दुधाची अपेक्षेइतकी आवक होत नाही. त्यामुळे स्पर्धेत दूध खरेदीसाठी बहुतांशी डेअरींकडून खरेदीदर वाढविण्यात आलेले आहेत.
दुधाचे खरेदीदर कात्रजकडून वाढविण्यात आलेले असले तरी विक्रीदरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दूध पावडरचा प्रतिकिलोचा दर 250 रुपये, तर बटरचा किलोचा दर 475 ते 500 रुपये आहे.
मागणी आहे. दरमहा सुमारे 450 मेट्रिक टन इतक्या पशुखाद्याची विक्री होत आहे. संघाला दूध पुरवठा करणाऱ्या प्राथमिक दूध संस्थांना प्रामुख्याने पशुखाद्य विक्री होते आणि ते पुढे दूध उत्पादक शेतकऱ्यांना विक्री करतात. तीन प्रकारच्या पशुखाद्यांची कात्रजकडून विक्री होत असल्याचे सांगण्यात आले.