पुणे : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली.
रमा ललितप्रसाद कापडी (वय ५२, रा. श्रीनिवास संकुल, माऊलीनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक देवेंद्र सत्यम बसान्नापल्ली (वय ४५, रा. नारकडपल्ली, जि. नाळगोंडा, तेलंगणा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत कापडी यांची मुलगी रेवती (वय २४) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमा कापडी या एका शाळेत शिक्षिका आहेत. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्या दुचाकीवरून शाळेत निघाल्या हाेत्या. कात्रज-कोंढवा रस्त्यावर केसर लाॅजसमोर भरधाव ट्रकने पाठीमागून दुचाकीस्वार कापडी यांना धडक दिली. चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे, पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली.
गंभीर जखमी झालेल्या कापडी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करत आहेत. दरम्यान शहरात महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींच्या दौऱ्यामुळे या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला होता. तर काही नागरिकांनी सांगितले की अगोदरच रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. तसेच जखमी महिलेला तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळाली नसल्याचे देखील नागरिकांचे म्हणणे आहे.