पुणे

पुणे : कात्रज दूध संघ निवडणूक ; ११ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात

मोनिका क्षीरसागर

पुणे : पुढारी वृत्तसेवा     
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या  (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता ११ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.  दरम्यान, प्रतिस्पर्धी उमेदवाराने अर्ज मागे  घेतल्याने दौंड तालुका मतदारसंघातून राहुल रामदास दिवेकर आणि अनुसूचित जाती-जमाती गटामधून चंद्रकांत बाबुराव भिंगारे हे दोघेजण बिनविरोध निवडून आले आहेत.

यापूर्वी हवेलीतून गोपाळराव म्हस्के,  वेल्हे तालुक्यातून  भगवान पासलकर हे बिनविरोध विजयी झाले आहेत. पुरंदरमधून  मारुती जगताप हे बिनविरोध विजयी झाले आहेत. जगताप यांच्या हरकतीवर  पुरंदरमधील विद्यमान संचालक संदीप जगदाळे यांचा उमेदवारी अर्ज तीन अपत्य असल्याच्या कारणास्तव नामंजूर झाला असून, त्यावर बुधवारी (आज) उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे.

या निवडणुकीतून आतापर्यंत ६१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यापैकी अखेरच्या दिवशी तब्बल ५१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज मागे घेण्यासाठी गर्दी दिसून आली. शेवटपर्यंत कार्यकर्ते आणि नेते कार्यालयाबाहेर एकमेकांना भिडताना दिसून आले.  वडणूक कचेरीबाहेर काही पक्षाचे जिल्हास्तरीय नेते मंडळी, जिल्हा दूध संघाचे काही माजी संचालक ठाण मांडून बसले होते.  त्यांच्या समोरच काही उमेदवारांमध्ये अर्ज माघार घेण्याच्या मुद्यावर वादावादीदेखील झाल्याचे चित्र दिसून आले.

निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याबरोबर पुकारा करून अर्ज मागे घेण्याची कारवाई थांबवली. त्यानंतर जिल्ह्यातून आलेले उमेदवार आणि कार्यकर्त्यांची गर्दी ओसरली.

अशा होणार लढती  :  तालुका मतदार संघातील उमेदवार (प्रत्येकी १ जागा)

आंबेगाव : संघाचे  विद्यमान अध्यक्ष  विष्णू हिंगे ,अरुण गिरे.
भोर : दीपक भेलके, दिलीप थोपटे, अशोक थोपटे.
खेड :  अरुण चांभारे,  चंद्रशेखर शेटे.
जुन्नर  बाळासाहेब खिलारी, देवेंद्र खिलारी.
मावळ बाळासाहेब नेवाळे, लक्ष्मण ठाकर, सुनंदा कचरे.
मुळशी कालिदास गोपाळघरे, रामचंद्र ठोंबरे.
शिरूर स्वप्निल ढमढेरे, योगेश देशमुख.
महिला प्रतिनिधी (दोन जागा) –  संध्या फापाळे-जुन्नर, केशरबाई पवार-शिरूर, रोहिणी थोरात-दौंड,  लता गोपाळे-खेड.
इतर मागास प्रवर्ग (१जागा) :   वरूण भुजबळ- जुन्नर, भाऊ देवाडे- जुन्नर, अरुण गिरे-आंबेगाव.

SCROLL FOR NEXT