Sanjay Raut tweet : संजय राऊतांना राहुल गांधींचे पत्र, आम्ही तुमच्या पाठीशी, अन्यायाविरूद्ध लढू

Sanjay Raut tweet : संजय राऊतांना राहुल गांधींचे पत्र, आम्ही तुमच्या पाठीशी, अन्यायाविरूद्ध लढू

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) काही अधिकारी महाराष्ट्रात काही दलालांना हाताशी धरून खंडणीचे रॅकेट चालवत आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. (Sanjay Raut tweet)

दरम्यान, कालपासून मंत्री आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना पत्र लिहित, मी तुमच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात राहुल गांधी यांनी संजय राऊतांना काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचे लिहिले आहे. संजय राऊत यांनी राज्यसभा अध्यक्ष यांना ८ फेब्रुवारीला पत्र लिहिले होते. त्याची दखल राहुल गांधी यांनी घेतली आहे.

तपास यंत्रणांकडून तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना टार्गेट केले जात असल्याचा मी निषेध करत आहे. तुमच्या पत्रातून मोदी सरकार विरोधकांना शांत करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा खुलासा झाला आहे. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असून कोणतीही भीती आणि अनुकूलता न दर्शवता तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवत आहोत, असे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.

Sanjay Raut tweet : संजय राऊत यांचे ट्वीट करत आभार

राहुल गांधी यांनी लिहिलेले पत्र संजय राऊत यांनी ट्वीटरला शेअर करत राहुल गांधींचे आभार मानले. लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या या आमच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला एकत्र लढावे लागेल. केंद्रीय तपास यंत्रणा एका पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागत आहेत हे केवळ दुर्दैवी नाही तर धोकादायकही आहे. पण मला खात्री आहे, ही वेळ सुद्धा निघून जाईल असे संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणाले

'ईडी'ने नोटीस धाडलेल्या बिल्डरांकडून दलाल असलेल्या जितेंद्र नवलानीच्या 7 कंपन्यांच्या बँक खात्यांत 59 कोटी रुपये जमा झाल्याचे पुरावेही राऊत यांनी यावेळी सादर केले. या आरोपांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

'ईडी'चे अधिकारी महाराष्ट्रात खंडणीचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी 15 फेब्रुवारी रोजी मुंबईत केला होता. त्यावेळी राऊत यांनी आपण लवकरच हे पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांकडे चौकशीसाठी देऊ, असे सांगितले होते. दरम्यान, राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 28 फेब्रुवारी 2022 रोजी पत्र दिले. यानंतर मंगळवारी शिवसेना भवनात राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.

राऊत म्हणाले, आज मी सकाळपासून आमच्या कार्यकर्त्यांवर प्राप्तिकर विभागाकडून छापे पडल्याचे पाहत आहे. महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत मुंबईच्या प्रत्येक विभागात आणि शाखेत प्राप्तिकर विभागाचा छापा पडेल, असे मला वाटत आहे.

आता या विभागाकडे हेच काम शिल्लक राहिले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमधील लोकांनाच लक्ष्य करत आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने हे मोठे षड्यंत्र रचले गेले आहे.

Sanjay Raut tweet : केंद्रीय तपास यंत्रणा आता चौकशी का करत नाहीत?

प्राप्तिकर विभाग आणि 'ईडी'ला आम्ही आतापर्यंत पुराव्यांसोबत 50 लोकांची नावे पाठवली आहेत. यावर चौकशी करावी, असे या तपास यंत्रणांना का वाटत नाही? भाजपशी संबंधित ढवंगाळे यांच्या 75 बोगस कंपन्यांची यादी मी 'ईडी'कडे पाठवली होती. 'ईडी'च्या सर्वात जास्त कारवाया या महाराष्ट्रात होत आहेत.

महाविकास आघाडीच्या 14 प्रमुख नेत्यांवर 'ईडी'ने कारवाई केली आहे. भाजप नेत्यांवर कोणत्याही तपास यंत्रणांची कारवाई झालेली नाही. या सर्व कारवाया कोण नियंत्रित करत आहे, याबाबत शिवसेना लवकरच मोठा खुलासा करेल, असा दावाही संजय राऊत यांनी यावेळी केली.

भाजप नेत्यांचा काळा पैसा उघड करताच मला अटक होईल : राऊत

संजय राऊत म्हणाले की, मागील पत्रकार परिषदेमध्ये मी सुमीत कुमार नरवर नावाच्या दूधवाल्याचा उल्लेख केला होता. बुलंदशहरमध्ये राहणारा हा दूध विक्रेता आता मलबार हिलला राहतो.

त्या व्यक्तीची संपत्ती पाच-सात वर्षांत आठ हजार कोटींवर गेली आहे. त्याचीही माहिती मी 'ईडी'कडे दिली आहे; पण 'ईडी' त्याला भाजपच्या चष्म्यातून पाहत असल्याने त्याच्याबाबत काहीच कारवाई करत नाही, असा आरोप त्यांनी केला. भाजप नेत्यांचा काळा पैसा उघड करताच मला अटक होईल, असे राऊत म्हणाले.

जितेंद्र नवलानी 'ईडी'चा दलाल

राज्यात 'ईडी'चे काही अधिकारी दलालांच्या माध्यमातून खंडणी रॅकेट चालवत आहेत. 'ईडी'चे अधिकारी या दलालांना पुढे करून बिल्डर, डेव्हलपर आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांना धमकावून त्यांच्याकडून वसुली करतात. या सगळ्यांचे पुरावे मी तपास यंत्रणांना दिले आहेत. जितेंद्र नवलानी हा त्यातील एक दलाल असून, त्याने 60 कंपन्यांकडून 100 पेक्षा जास्त लोकांकडून पैसे वसूल केले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

सोमय्या पिता-पुत्र जेलमध्ये जाणारच : राऊत

संजय राऊत यांनी मागील पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील यांच्यावर पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांच्याकडून वसुली केल्याचा आरोप केला होता. त्याचे पुरावे देताना संजय राऊत यांनी सोमय्यांचे चिरंजीव नील सोमय्या यांनी निकॉनमध्ये भागीदारी कशी मिळवली याची माहिती दिली.

राकेश वाधवानला या प्रकरणात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून भागीदारी मिळवली. ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांच्यासोबत सोमय्यांनी भागीदारी कशी केली, असा सवाल करतानाच याचे धागेदोरे हाती लागले असून, सोमय्या बाप-बेटे जेलमध्ये जाणारच, असा पुनरुच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news