Kasturi Club Haldi Kunku Event Pudhari
पुणे

Kasturi Club Haldi Kunku Event: नऊवारी साडी, उखाणे आणि कलाकारांसोबत धम्माल; ‘कस्तुरी क्लब’चा हळदी-कुंकू सोहळा उत्साहात

‘स्टार प्रवाह’च्या कलाकारांची उपस्थिती; रॅम्पवॉक, स्पर्धा आणि वाणभेटीतून महिलांचा जल्लोष

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नऊवारी साडी अन्‌‍ मराठमोळ्या नथीचा साज... उखाणे अन्‌‍ विविध गीतांची रंगत... कलाकारांसोबत गप्पा... मनोरंजक गेम-शोमध्ये कस्तुरींचा उत्स्फूर्त सहभाग... एकमेकींना हळदी-कुंकू लावत संक्रांतीचे वाण देत साजरा केलेला सण अन्‌‍ कस्तुरींसाठी रंगलेल्या विविध स्पर्धा... अशा उत्साहपूर्ण वातावरणात रविवारी (दि. 8) हळदी-कुंकू सोहळा पार पडला. ‌‘दै. पुढारी कस्तुरी क्लब‌’ आणि ‌‘स्टार प्रवाह‌’ वाहिनीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात कस्तुरी क्लबच्या मंचावर महिलांनी अक्षरश: धम्माल केली.

सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम रंगला. ‌‘स्टार प्रवाह‌’ वाहिनीवरील मालिकेतील कलाकारांची भेट, त्यांच्यासोबत गप्पांची तसेच सेल्फी क्लिकची मिळालेली संधी, हे निमित्त महिलांसाठी खास ठरले. लाल अन्‌‍ पिवळ्या रंगांचा पारंपरिक पेहराव केलेल्या कस्तुरी सदस्यांच्या तुफान गर्दीने सभागृह फुलून गेले. उखाणे स्पर्धा, पारंपरिक पेहरावात रॅम्पवॉक, अशा प्रत्येक कार्यक्रमांत कस्तुरींनी उत्साहात सहभाग घेतला.

‌‘दै. पुढारी कस्तुरी क्लब‌’च्या वतीने महिलांसाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हा आगळावेगळा सोहळा पार पडला. मराठी संस्कृतीचा सन्मान आणि सामाजिक संदेश, हा सुंदर मिलाफ या कार्यक्रमात पाहायला मिळाला. कार्यक्रमाला कस्तुरींनी मोठ्या संख्येने गर्दी केली. लाल आणि पिवळ्या रंगाचा पेहराव केलेल्या कस्तुरींनी सर्वांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक कस्तुरीचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते ते ‌‘स्टार प्रवाह‌’ वाहिनीवरील ‌‘लपंडाव‌’ या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार. यातील ‌‘सरकार‌’ म्हणजेच रूपाली भोसले, ‌‘सखी‌’च्या भूमिकेतील कृतिका देव, तर ‌‘कान्हा‌’ म्हणजेच चेतन वडनेरे यांची उपस्थिती. त्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच कस्तुरींनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. तिन्ही कलाकारांनी कस्तुरी क्लबच्या महिला सदस्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या आणि विविध किस्सेही शेअर केले.

‌‘दै. पुढारी कस्तुरी क्लब‌’च्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांच्या उपस्थितीने सभागृहात चैतन्यमय वातावरण झाले. यानिमित्ताने कलाकारांसोबत कस्तुरींनी सेल्फीही क्लिक केले; शिवाय नृत्य करण्याचा आनंदही लुटला.

कस्तुरींच्या रॅम्पवॉकने धम्माल

‌‘बाईपण भारी देवा‌’ या गाण्यावर सगळ्या विभागप्रमुख तसेच उपस्थित सदस्या थिरकल्या. पारंपरिक नऊवारी साडी आणि दागिने असा पेहराव केलेल्या कस्तुरींनी या वेळी रॅम्पवॉक केला. या वेळी अनिता शिंदे आणि ग््रुापने क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विवाह सोहळ्याचा प्रसंग सादर केला. त्यानंतर कस्तुरींसाठी विविध स्पर्धा रंगल्या. उखाणे स्पर्धेसह विविध मनोरंजक खेळही महिलांसाठी घेण्यात आले. उखाणा स्पर्धेत अनेक कस्तुरी सदस्यांनी सहभाग घेतला. त्यात रोहिणी भापकर यांना ‌‘आहेराची साडी‌’, तर रॅम्पवॉकमध्ये मिलन पवार आणि पल्लवी पायगुडे यांनाही ‌‘आहेराची साडी‌’ देण्यात आली. या वेळी कस्तुरींसाठी लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले. ‌‘होम मिनिस्टर‌’फेम आणि प्रबोधनकार मेघना झुझम यांनी कार्यक्रमाचे बहारदार निवेदन केले.

चिंतामणी गार्डन सोसायटीत कलाकारांचे जल्लोषात स्वागत

‌‘स्टार प्रवाह‌’ वाहिनीवर सध्या ‌‘सावित्री ज्योती‌’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेचाच एक भाग म्हणून ‌‘स्टार प्रवाह‌’ वाहिनीवरील कलाकारांनी सावित्री-जोतिबा यांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी कार्यक्रमाच्या आधी आंबेगाव बु. येथील चिंतामणी गार्डन सोसायटीला भेट दिली. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर पुष्पवृष्टी करीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अभिनेत्री रूपाली भोसले, कृतिका देव, चेतन वडनेरे यांचे कस्तुरी विभागप्रमुख मनीषा अडसूळ यांच्यासह सोसायटीतील महिलांनी औक्षण केले. तर, सोसायटीचे अध्यक्ष सुनील पाबळे यांच्यासह संचालक मंडळाने कलाकारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

‌‘कस्तुरी क्लब‌’च्या सदस्यनोंदणीच्या ओळखपत्राचे अनावरण

या कार्यक्रमात ‌‘दै. पुढारी कस्तुरी क्लब‌’च्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी योगेश जाधव, उपस्थित कलाकार आणि कस्तुरी क्लबच्या विभागप्रमुखांच्या हस्ते कस्तुरी क्लब सदस्यनोंदणीच्या ओळखपत्राचे अनावरण करण्यात आले. डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांनी कस्तुरींचा उत्साह वाढविला.

दंताळे ज्वेलर्सकडून वाणभेट

दंताळे ज्वेलर्स हे कार्यक्रमाचे गिफ्ट पार्टनर होते. दंताळे ज्वेलर्सकडून कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना वाण देण्यात आले. दंताळे ज्वेलर्सचे संस्थापक क्षितिज दंताळे आणि त्यांच्या पत्नी सीमा दंताळे हे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT