Karnataka Hapus Pudhari
पुणे

Pune Karnataka Hapus Mango Price: कर्नाटक हापूस आंब्याचे दर तेजीत; पुणे बाजारात भाव वाढले

मान्सून लांबल्याने मागणी वाढली; डझनाला 700 रुपयांपर्यंत दर पोहोचला

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: राज्यात मान्सून दाखल झाला असला, तरी तो अद्याप सक्रिय न झाल्याने पावसाची प्रतीक्षा कायम आहे. याचा थेट फायदा कर्नाटकी हापूसला झाला असून, ग्राहकांची मागणी टिकून राहिल्याने बाजारात हापूस आंब्याने जून महिन्यातील उच्चांकी उसळी घेतली आहे. मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात हापूसच्या तीन ते पाच डझनांच्या पेटीचे भाव १ हजार २०० ते १ हजार ६०० रुपयांवर पोहचले आहेत. तर, किरकोळ बाजारातही हापूसच्या प्रतिडझनाचे दर ६०० ते ७०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर पाऊस सुरू होताच कर्नाटकातील हापूस आंब्याचा हंगाम उतरणीला लागतो. यंदा मात्र चित्र पूर्णपणे वेगळे आहे. रत्नागिरी हापूसचा संपलेला हंगाम तसेच गावरान हापूसची कमी उपलब्धतात, यामुळे बाजारात कर्नाटक हापूस हा प्रमुख पर्याय उरला आहे. त्यामध्ये दर्जेदार आंबा बाजारात उपलब्ध होत असल्याने कर्नाटक हापूसकडेच खरेदीदारांचा ओढा वाढला आहे.

त्यामुळे मागणीचा दबाव कायम राहिला असून, त्याचा थेट परिणाम दरवाढीच्या रूपाने दिसून येत आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी कर्नाटकी हापूसच्या सुमारे सात ते आठ हजार पेट्यांची आवक झाली. एरवी जूनच्या मध्यावधीमध्ये होणारी ही आवक कायम असली तरी मागणी चांगली असल्याने गतवर्षीच्या तुलनेत आंब्याने पेटीमागे तीनशे ते चारशे रुपयांची उसळी घेतली आहे.

गावरान हापूसची तुरळक आवक

बाजारात तयार गावरान हापूसचीही आवक होत आहे. रविवारी बाजारात वीस डझनांच्या पाच ते दहा डागांची आवक झाली. बाजारात त्याच्या डझनाला ३०० रुपये दर मिळाला. बाजारात गावरान हापूसची होत असलेली आवक तुरळक स्वरूपात असून, घरगुती ग्राहकांचा खरेदीकडे मोठा कल आहे, अशी माहिती गावरान हापूसचे व्यापारी यशवंत कोंडे यांनी दिली.

साधारणपणे जून महिन्यात पावसामुळे आंब्याची विक्री मंदावते. यंदा मात्र वातावरण कोरडे असल्याने ग्राहक अजूनही हापूसची खरेदी करीत आहेत. रत्नागिरी हापूसचा हंगाम संपल्याने कर्नाटक हापूसला चांगली मागणी मिळत आहे. मागणीच्या तुलनेत उपलब्ध माल मर्यादित असल्याने दर तेजीत आहेत. पुढील दहा-पंधरा दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
रोहन उरसळ, कर्नाटक हापूसचे व्यापारी, मार्केट यार्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT