Kamala Nehru Hospital Pune Pudhari
पुणे

Kamala Nehru Hospital Pune: कमला नेहरू रुग्णालयाचा होणार कायापालट!

पहिल्या टप्प्यात 13 कोटींचा निधी; आयुक्त नवल किशोर राम यांनी केलेल्या पाहणीत आढळल्या अनेक त्रुटी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महापालिकेचे मोठे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या कमला नेहरू रुग्णालयाची दयनीय अवस्था महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या पाहणीतून उघड झाली आहे. रुग्णालयात अनेक मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याची स्पष्ट कबुली त्यांनी दिली. सर्वसामान्यांचे रुग्णालय अशी ओळख असलेल्या या रुग्णालयाचा कायापालट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 13 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, तसेच रुग्णांना कमी दरात उपचार मिळावेत, यासाठी अद्ययावत सुविधाही उभारण्यात येणार असल्याचे आयुक्त राम यांनी सांगितले.

मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय हे शहरातील गोरगरीब, गरजू रुग्णांसाठी पालिकेकडून चालवलेले महत्त्वाचे रुग्णालय आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत रुग्णालयाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. महापालिकेला सर्व खर्च परवडत नसल्याने रुग्णालयातील काही विभाग पीपीपी पद्धतीने चालवले जातात. त्यामुळे त्या विभागातील सुविधा चांगल्या असल्या तरी इतर अनेक विभागांत सुविधांचा अभाव आहे. याचा त्रास येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना होतो.

आयुक्त राम यांनी या रुग्णालयाची काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या पाहणीत अनेक उणिवा त्यांना जाणवल्या. येथील जुनी उपकरणे, खराब झालेली व्यवस्था याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य, बांधकाम आणि संबंधित विभागांसह महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये या रुग्णालयाच्या 13 कोटी रुपयांच्या सुधारणा आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीनंतर नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी संवाद साधत रुग्णालयात करण्यात येणाऱ्या बदलांची माहिती दिली.

राम म्हणाले, “रुग्णालयातील यंत्रणा अत्यंत जुनी व खराब झाली आहे. विद्युत दुरुस्ती, प्लंबिंग, रंगरंगोटीपासून ते अत्याधुनिक यंत्रसामग््राीपर्यंत अनेक गोष्टींचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. उपचारांसाठी आवश्यक असलेल्या यंत्रणाही अपुऱ्या आणि कालबाह्य आहेत. त्यामुळे नवीन उपकरणे खरेदी करून सर्वसामान्यांना कमी खर्चात उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न आहे.”

रिक्त पदांची भरती; वेतनवाढीचा प्रस्ताव

कमला नेहरू रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका तसेच इतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे दीर्घकाळ रिक्त आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत डॉक्टर व तज्ज्ञांना 45 ते 60 हजार रुपयांपर्यंत वेतन निश्चित आहे. मात्र हे वेतन अपुरे असल्याने पुरेसे मनुष्यबळ मिळत नाही. महापालिका यामध्ये स्वतः निधी टाकून 80 हजार ते दीड-दोन लाख रुपये वेतन देण्याचा प्रस्ताव विचारात घेत आहे. याबाबत अभ्यास सुरू आहे. गुणवत्तेनुसार डॉक्टरांना चांगले वेतन देऊन रुग्णालयाची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे आयुक्त राम यांनी सांगितले.

“ कमला नेहरू रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण गरीब आणि गरजू असतात. त्यांना कमी दरात आवश्यक आरोग्यसेवा देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. या रुग्णालयात सुधारणा करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 13 कोटी खर्च केला जाणार आहे. आवश्यक असल्यास हा खर्च 40 कोटींपर्यंत वाढवण्याची तयारी आहे.”
नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका

कमला नेहरू रुग्णालयात मोफत आयसीयू सुरू करा!

पुणे ;

कमला नेहरू रुग्णालयातील आयसीयूमध्ये मोफत खाटा सुरू न केल्याने, एनआयसीयू (नवजात अतिदक्षता विभाग) बंद पडत असल्याने आणि पीआयसीयू उपलब्ध नसल्याने शेकडो रुग्णांना ससूनकडे धाव घ्यावी लागत आहे. या गंभीर परिस्थितीविरोधात रुग्ण अधिकार सामाजिक संस्थेतर्फे आंदोलन करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष विलास कांबळे यांच्यासह मनोज किराड, दिगंबर अडागळे, सतीश तुपसौंदर, मांगीलाल शर्मा, रामदास खेसे आदी कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. तब्बल 400 खाटांच्या कमला नेहरू रुग्णालयात आयसीयू मोफत उपलब्ध नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. महापालिकेने पीपीपी तत्त्वावर 20 खाटांच्या आयसीयूला मान्यता दिली असून, त्यापैकी 7 खाटा महापालिकेच्या रुग्णांसाठी मोफत उपलब्ध होणार आहेत. उपोषणानंतर आयसीयू पुढील सात दिवसांत आणि एनआयसीयू तीन महिन्यांत सुरू करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती कांबळे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT