पुणे: ख्रिसमस पार्टी करण्याची बतावणी करून 13 वर्षीय शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली. कुतबुद्दीन अली महंमद (वय 72, रा. महंमदवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत शाळकरी मुलीच्या आईने हडपसरमधील काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बुधवारी (दि. 24 डिसेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी ज्येष्ठ नागरिकाने मुलीला त्याच्या घरी बोलावून घेतले. ‘ख्रिसमस पार्टी करायला घरी येशील का? तुला चॉकलेट देतो’, असे आमिष त्याने मुलीला दाखविले. त्यानंतर मुलीला सदनिकेत बोलावून घेतले. सदनिकेचा दरवाजा बंद करून त्याने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) आरोपीविरुद्ध गु्न्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करत आहेत.
तरुणीशी अश्लील कृत्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा
पादचारी तरुणीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत 22 वर्षीय तरुणीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी 22 डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जेवण करून शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळी दुचाकीस्वार आरोपीने पादचारी तरुणीशी अश्लील कृत्य केले. तरुणीने आरडाओरड केल्यानंतर आरोपी पसार झाला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले तपास करत आहेत.
पादचारी महिलेचा विनयभंग करून धमकी
पादचारी महिलेशी अश्लील कृत्य करून तिला धमकाविल्याप्रकरणी एका विरुद्ध लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, बलराज संदुपटला (रा. संगमवाडा, भवानी पेठ) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी महिला लष्कर भागात कामाला आहेत.
त्या 23 डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास कामावरून घरी निघाल्या होत्या. त्यावेळी आरोपीने महिलेला अडवले. ‘तू चारित्र्यहीन आहे,’ असे सांगून त्याने महिलेचा विनयभंग केला. ‘तुझ्या मुलांना खोट्या पोलिस केसमध्ये अडकवतो’, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी महिलेचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. अखेर आरोपीच्या त्रासामुळे घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याबाबत पोलिस हवालदार धायगुडे तपास करत आहेत.