आळेफाटा: जुन्नर तालुक्यातील आणे येथे बुधवारी (दि. ८) पहाटे पूर्ववैमनस्यातून तुषार रामदास दाते (वय ३८) यांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर आरोपी मनोज महादेव हांडे (रा. चैतन्यपूर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) याने पोलिसांच्या ताब्यात जाण्यापूर्वी कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या खळबळजनक घटनेमुळे परिसरात मोठी घबराट पसरली आहे.
मृताच्या पत्नी सविता तुषार दाते (वय ३७) यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मनोज हांडे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार दाते हे बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गायींसाठी ऊस आणण्यासाठी घरामागे गेले होते. काही वेळातच त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पत्नी सविता त्या दिशेने धावल्या. त्यावेळी आरोपी मनोज हांडे हा तुषार दाते यांच्यावर धारदार सुऱ्याने सपासप वार करत असल्याचे त्यांनी पाहिले.
सविता यांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांच्यावरही सुरा उगारला. त्यांनी प्रसंगावधान राखून तेथून पळ काढला. कुटुंबातील इतर सदस्य घटनास्थळी पोहोचताच आरोपीने तेथून पळ काढला. गंभीर जखमी तुषार दाते यांना तातडीने आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील आणि पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिस पुढील तपास करत आहेत.
जुन्या गुन्ह्यांच्या रागातून हत्या
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपीची फेसबुकद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर त्याने दाते पती-पत्नीला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. याप्रकरणी त्याच्यावर आळेफाटा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते. महिनाभरापूर्वीच तो येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. याच जुन्या गुन्ह्यांचा आणि अटकेचा राग मनात धरून त्याने तुषार दाते यांची हत्या केली.
ताब्यात घेण्यापूर्वी घेतले कीटकनाशक
खुनाच्या घटनेनंतर आरोपी मनोज हांडे याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, ग्रामस्थांनी त्याचा शोध घेऊन त्याला घेरले. ग्रामस्थांना पाहताच आरोपीने स्वतःजवळ असलेले कीटकनाशक औषध प्राशन केले. आळेफाटा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले आणि उपचारासाठी मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.