

पुणे: खडकवासला धरणातून बुधवारी सकाळी २८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होताच सिंहगड रस्त्यालगतच्या एकतानगरी परिसरात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली. द्वारका, जलपूजन आणि आनंद पार्कसह अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांची धावपळ उडाली. दुपारनंतर धरणातील विसर्ग कमी झाल्याने पाणी ओसरले असले, तरी दरवर्षी उद्भवणाऱ्या या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला की, या परिसरातील सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरते. त्यामुळे वाहनांचे नुकसान, विद्युत उपकरणे निकामी होणे आणि लाखो रुपयांची आर्थिक हानी नागरिकांना सहन करावी लागते. प्रत्येक पावसाळ्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन घटनास्थळी भेट देऊन पाहणी करतात. पंचनामे होतात आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची आश्वासने दिली जातात. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
यापूर्वी या भागात पूर संरक्षण भिंत उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. निविदा प्रक्रियेसह प्रशासकीय हालचालीही झाल्या; मात्र प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कागदोपत्री निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी, यातील दरीमुळे नागरिकांना दरवर्षी पुराच्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
बुधवारी सकाळी वाढलेल्या पाणीपातळीमुळे द्वारका आणि जलपूजन सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले, तर आनंद पार्कसह परिसरातील अनेक रहिवाशांनी वाहने आणि इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी धावपळ केली. शिवणे येथील भीमनगर परिसरातील काही घरांमध्येही पाणी शिरल्याची घटना घडली.
पूरस्थितीची माहिती मिळताच महापौर मंजूषा नागपुरे यांनी पहाटेपासून राजपूतनगर, पुलाचीवाडी, निंबजनगर, एकतानगरी आणि विठ्ठलनगर परिसराची पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनीही परिसराची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजनांवर काम सुरू असल्याचे सांगितले.
नदीपात्रालगतच्या सोसायट्यांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी येतात, आश्वासने देतात; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे.
राजू चव्हाण, नागरिक, एकतानगरी
अचानक पाणी आल्यामुळे गॅरेजमधील कॉम्प्रेसर, सीसीटीव्ही आणि इतर विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान होते. प्रत्येक वेळी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत आर्थिक फटका बसतो. पंचनामे होतात; पण मदत मिळत नाही. पूर आला की सर्वजण पाहणी करून निघून जातात.
संभाजी कडू, रहिवासी, आनंद पार्क सोसायटी
पार्किंगमध्ये एक ते दीड फूट पाणी साचले होते. महिला आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. केवळ संरक्षक भिंत उभारून हा प्रश्न सुटणार नाही. नदीपात्रातील अडथळे दूर करून पाण्याचा प्रवाह मोकळा करणेही तितकेच गरजेचे आहे.
विलास गोरीवले, अध्यक्ष, द्वारका सोसायटी