ओतूर: जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी बंद घरांची कुलपे तोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओतूर ते नाशिक दरम्यान सुमारे ५० कॅमेऱ्यांच्या मदतीने तपासाची साखळी जोडत पोलिसांनी तिघांना अटक केली. या टोळीकडून ओतूरमधील तीन आणि नारायणगाव येथील एक अशा चार घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले असून, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या कारसह तब्बल ३८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या आणखी एका व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
५० सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने तपासाची साखळी जोडली
ओतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. याशिवाय ओतूर आणि नारायणगाव परिसरातही अशाच प्रकारच्या घरफोड्या झाल्या होत्या. या घटनांची गांभीर्याने दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करताना संशयित कार पोलिसांच्या निदर्शनास आली. या कारचा ओतूरपासून नाशिकपर्यंत सुमारे ५० सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून माग काढण्यात आला. तांत्रिक तपास आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कार नाशिक जिल्ह्यातील वडाळा परिसरात राहणारा सोनू उर्फ शरीफ रसूल शेख वापरत असल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील वडाळा आणि लासलगाव परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत
१)वसीम मुनीर पठाण (वय २९),
२)अदनान युनूस पठाण (वय २६),
३) सोनू उर्फ मोहम्मद शरीफ रसूल शेख (वय ४०, तिघेही रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक ) अटक केलेल्या या आरोपींकडून पोलिसांनी १९ तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो ७७० ग्रॅम चांदी, दोन लाख रुपये रोख आणि घरफोड्यांसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
तपासा दरम्यान आरोपींनी ओतूर परिसरातील तीन आणि नारायणगाव येथील एक अशा एकूण चार घरफोड्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीचे दागिने खरेदी करणारा सागर अशोक शिंदे (वय ३०, रा. विंचूर, ता. निफाड) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांची नजर चुकविण्यासाठी चोरांचा वॉकी-टॉकीचा वापर
घरफोड्या करताना पकडले जाऊ नये, तसेच परस्परांमध्ये संपर्क साधता यावा, यासाठी आरोपी वायरलेस वॉकी-टॉकीचा वापर करत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या टोळीपर्यंत पोहोचण्यात यश आले. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव आणि त्यांच्या पथकाने या कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव हे करीत आहेत.