Junnar Crop Damage Pudhari
पुणे

Junnar Crop Damage: जुन्नरमध्ये संततधारेचा शेतीला फटका; टोमॅटो, भाजीपाला पिकांवर रोगराईचे संकट

चार दिवसांच्या पावसाने शेतीकामे ठप्प; उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: जुन्नर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. भाजीपाला आणि खरीप पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. रोग नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

सलग कोसळणाऱ्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले आहे. काही ठिकाणी जमिनी उपाळल्या असून, सोयाबीनसह इतर खरीप पिके कुजण्याची भीती आहे. भाजीपाला उत्पादकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. टोमॅटो पिकावर विविध बुरशीजन्य रोगांसह विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. फळांवर मोठ्या प्रमाणात काळे डाग पडत आहेत. टोमॅटो तोडणी करताना निम्म्याहून अधिक फळे शेतातच टाकून द्यावी लागत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये लाल रंगाचा चिखल आणि सडलेले टोमॅटो पाहावयास मिळत आहेत. उत्पादन खर्चही निघण्याची शक्यता धूसर झाल्याने टोमॅटो उत्पादकांचे आथिर्क गणित बिघडणार आहे.

सलग पावसामुळे मेथी आणि कोथिंबिरीचे पीक सडून गेले. याशिवाय भेंडी, गवार, चवळी, पावटा, तोंडली, घेवडा, दुधी भोपळा आणि इतर वेलवर्गीय भाजीपाल्यावरही रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे बाजारपेठेत दर्जेदार मालाची आवक कमी होण्याची शक्यता आहे.

पाऊस उघडल्यानंतर रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशके आणि किटकनाशकांच्या अनेक फवारण्या कराव्या लागणार असल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे. आधीच वाढलेल्या शेतीखर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता अतिरिक्त खर्चाचे नवे संकट उभे ठाकले आहे.

दरम्यान, आठवडाभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळेही तालुक्यात मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी सुपीक माती वाहून गेली. काही शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने भरल्या. महसूल आणि कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केले असले तरी अद्याप नुकसानग्रस्तांना मदत मिळालेली नाही.

शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून भाजीपाला व खरीप पिकांच्या नुकसानीची भरपाई जाहीर करावी. औषध फवारणीसाठी विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT