

राजगुरुनगर: खेड तालुक्यातील गोलेगाव, खराबवाडी येथील गायरान जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेल्या, वाणिज्य वापरात असलेल्या ३७३ मिळकतींवर दोन दिवसांत बुलडोझर फिरणार आहे.
याबाबत तहसील कार्यालयात शुक्रवारी (दि. २४) आयोजित पत्रकार परिषदेत तहसीलदार प्रशांत बेडसे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी ही माहिती दिली. या वेळी नायब तहसीलदार राम बीजे, चेतन मोरे या वेळी उपस्थित होते. या अतिक्रमणविरोधी कारवाईबाबतच्या संबंधित मिळकतधारकांना अंतिम नोटीस दिली आहे. त्यांना २४ तासांत आपापली बांधकामे आणि साहित्य काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. साहित्य काढून न घेतल्यास त्या निष्कासित मिळकतीच्या मालकाच्या नावाने खर्चाचा बोजा इतर मिळतीवर नोंद करण्यात येणार असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे तत्काळ हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यातही खेड तालुक्यातील गोलेगाव आणि खराबवाडी येथील गायरान जमिनीवरील मिळकती बाबतचा वाद उच्च न्यायालयात सुरू होता. त्याबाबत आदेश झाला असून, या दोन्ही ठिकाणच्या खासगी व खासगी संस्थांच्या सर्व प्रकारच्या मिळकतीवर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येणार आहे. सध्या वाणिज्य मिळकती जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. पावसाळा संपल्यावर म्हणजे सप्टेंबर महिन्यात रहिवासी असलेल्या मिळकतीवर सुद्धा ही धडक कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे चाकण परिसरातील दोन्ही गावांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेकांचे लहान-मोठे व्यवसाय गाळे, दुकाने पाडली जाणार असल्याने रोजंदारीचा प्रश्न उभा राहणार आहे. अनेकांचे संसार उघड्यावर येणार आहेत. अतिक्रमणविरोधी कारवाई होणाऱ्या मिळकतीमध्ये खराबवाडी येथील एका खासगी संस्थेच्या शाळा इमारतीचा समावेश आहे.
शालेय वर्ष सुरू झालेल्या अवस्थेत असताना येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधांतरी येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. चाकण लगतच्या खराबवाडी येथील २ एकर गायरान जागेत २८६ आणि आळंदी परिसरात असलेल्या गोलेगाव येथील दीड एकर (६० आर) गायरान क्षेत्रातील ८ ७ अशा एकूण ३७३ मिळकतीवर येत्या दोन दिवसांत बुलडोझर फिरणार आहे. त्यासाठी साहित्य, महसूल अधिकारी, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन केले असल्याचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सांगितले.