

सासवड: पुरंदर तालुक्यातील पानवडी-शेलारवाडी-बहिरवाडी घाट परिसरात मुसळधार पावसामुळे गुरुवारी (दि. २३) मध्यरात्री मोठी दरड कोसळली आहे. यामुळे रस्त्यावर चिखल, दगड आणि राडारोडा साचला आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी मात्र या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील डोंगरांची माती सैल झाली. काही ठिकाणी माती व दगडांनी भरल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहू लागले. त्यामुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले असून, काही भाग वाहून गेला आहे.
रस्त्यावर वाहून आलेले दगड, खडी आणि चिखल यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. स्थानिक नागरिकांनी वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. आता रस्ता साफसफाई, दरड हटविणे आणि धोकादायक ठिकाणी संरक्षणात्मक उपाय तातडीने करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
रस्त्यालगत योग्य पाण्याचा निचरा नाही. त्यामुळे पाणी थेट रस्त्यावर येते आणि रस्त्याची धूप वाढते. परिणामी, रस्ता वाहून जातो, खड्डे पडतात आणि दगड-खडी रस्त्यावर पसरते. अशा परिस्थितीत दुचाकीस्वार सर्वाधिक धोक्यात आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांच्या जीवाशी खेळ?
पानवडी, शेलारवाडी आणि बहिरवाडी घाट परिसरातील दरडी कोसळण्याची समस्या कायम आहे. दर वर्षी पावसाळ्यात या घाटात दरडी, रस्ता खचणे आणि चिखल साचण्याच्या घटना घडतात. तरीही कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही. परिणामी, पावसाळ्यात नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.